Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Kolhapur › सिक्‍कीम राज्यपाल पाटील यांच्या हस्ते डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार

सिक्‍कीम राज्यपाल पाटील यांच्या हस्ते डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कोल्हापूरचे थोर सुपुत्र डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी (कॅबिनेट मंत्री दर्जा) नियुक्‍ती केली आहे. डॉ. जाधव यांच्यामुळे कोल्हापूरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे. त्यानिमित्त कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने डॉ. जाधव यांचा नागरी सत्कार सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते  आयोजित केला आहे. सर्वपक्षीय सत्कार समितीच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 14 जुलै) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सोहळा होणार आहे, अशी माहिती डॉ. योगेश जाधव सर्वपक्षीय सत्कार समितीच्या निमंत्रक, महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर बोंद्रे म्हणाल्या, समारंभाच्या अध्यक्षस्थानी महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषिमंत्री चंद्रकात पाटील असतील. श्रीमंत शाहू छत्रपती व माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला खा. राजू शेट्टी, खा. संभाजीराजे छत्रपती, खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश आबीटकर, आ. उल्हास पाटील, आ. अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

शहरातील विविध पक्ष, संघटना, तालीम-संस्था यांच्या वतीने डॉ. जाधव यांच्या सत्कार सोहळ्याविषयी वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे डॉ. जाधव यांचा एकत्रितपणे जनतेच्या वतीने नागरी सत्कार सोहळा करण्याचे ठरले. त्यानुसार सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचेही महापौर सौ. बोंद्रे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. योगेश जाधव सर्वपक्षीय सत्कार समितीचे सहनिमंत्रक आर. के. पोवार व बाबा पार्टे, ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी महापौर सौ. हसिना फरास यांच्यासह इतर उपस्थित होते.