होमपेज › Kolhapur › वस्त्रनगरीत मजुरीवाढीवरून संघर्षाची चिन्हे

वस्त्रनगरीत मजुरीवाढीवरून संघर्षाची चिन्हे

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 28 2018 11:03PMइचलकरंजी : प्रतिनिधी

महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी 6 पैसे मजुरी वाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या मजुरी वाढीला यंत्रमागधारक संघटनेने तीव्र विरोध दर्शवित एक पैशाचीही मजुरी वाढ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यंत्रमागधारकांचा मजुरी वाढीचा विरोध पाहता कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी 6 पैशांऐवजी 9 पैशांची मजुरी वाढ मागितली आहे. परिणामी मजुरी वाढीवरून कामगार आणि मालक यांच्यात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली. कामगार आणि यंत्रमागधारक संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास 2013 मध्ये झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्त्रनगरीवरील संपाचे ढग कायम आहेत.

मजुरी वाढीच्या प्रश्‍नावरून यंत्रमाग कामगारांनी 2013 मध्ये 45 दिवसांचा संप पुकारला होता. त्यावेळी कामगार आणि मालक यांच्या संयुक्त करार करण्यात आला. त्यानुसार महागाई भत्त्याप्रमाणे मजुरी वाढ आणि 16.66 टक्के बोनस देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार 2017 चे 6 पैसे आणि 2018 चे 3 पैसे असे 9 पैशांची मजुरी वाढ सर्व कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी 1 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सहायक कामगार आयुक्तांनी 3 पैशांची मजुरी वाढ घोषित केली. मात्र, कामगार संघटनेने ही वाढ अमान्य करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी 6 पैशांची घोषणा केली. त्यामुळे कामगार संघटना संप स्थगित करण्याच्या मानसिकतेत होते. मात्र, यंत्रमागधारक संघटनांनी ही मजुरी वाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी 6 पैसे मजुरी वाढ मान्य करण्याच्या मानसिकतेत असलेल्या कामगार संघटनांनी 6 ऐवजी 9 पैशांचीच वाढ मिळावी यासाठी आग्रही झाल्या आहेत. 

सहायक कामगार आयुक्तांनी पंधरा दिवसांत 3 पैसे आणि 6 पैसे अशी मजुरी वाढीची केलेली घोषणा कामगार संघटनेच्या दबावामुळे केल्याचा आरोप यंत्रमाग संघटनांनी केला आहे. 2013 मध्ये केलेला करार हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार केलेली तडजोड होती तो कायदा नव्हता. सध्या वस्त्रोद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे 6 पैशांची मजुरी वाढ देणे यंत्रमागधारकांना न परवडणारे आहे. भिवंडी, मालेगाव, सोलापूर, येवला या वस्त्रोद्योग केंद्रापेक्षा इचलकरंजीचे कापड उत्पादनात मीटरला 50 पैशांची तफावत आहे. त्यामुळे 6 किंवा 9 पैशांची मजुरी वाढ देणे अशक्य आहे. त्यामुळे यंत्रमागधारक अडचणीत नाही तर पूर्ण व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

वस्त्रोद्योगाला संजीवनी मिळावी यासाठी राज्य शासनाने 1.66 पैसे प्रति युनिट वीज बिल आकारावे, साध्या यंत्रमागधारकांच्या कर्जावर 5 टक्के सवलत द्यावी तर केंद्र सरकारने कापूस खरेदीचे धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी यंत्रमागधारकांकडून सातत्याने केली जात आहे. व्यवसायातील काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कापसाला कमोडिटी मार्केटमधून वगळावे आणि सुताचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा, या मागणीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे. 

विविध कारणांनी आर्थिक संकटात सापडलेल्या वस्त्रोद्योगाला संप न परवडणारा आहे. मात्र, कामगार आणि मालक दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास वस्त्रनगरीत न भूतो न भविष्यती असा संप होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.