Thu, May 28, 2020 13:17होमपेज › Kolhapur › श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास; डिसेंबरपासून कामाला सुरुवात

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास; डिसेंबरपासून कामाला सुरुवात

Last Updated: Nov 09 2019 2:02AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाला डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात मल्टिपल पार्किंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी स्वतंत्र बजेट हेड सुरू केले. यामुळे निधी मिळण्याच्या प्रशासकीय प्रक्रियांचे अडथळे कमी होणार आहेत.

श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर (करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर) कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासाचा 80 कोटींच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा आराखडा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 7 कोटी 86 लाख रुपयांचा निधी खर्च करून  सरस्वती टॉकीज येथे मल्टिपल पार्किंग उभारण्यात येणार आहे.

चार कंत्राटदारांच्या निविदा

या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. चार कंत्राटदारांनी त्याला प्रतिसाद दिला. मंगळवारी त्या निविदा उघडण्यात आल्या. सध्या या निविदांची तांत्रिक छाननी सुरू आहे. यानंतर येत्या दोन दिवसांत त्या निविदा ‘कमर्शियल ओपनिंग’ होतील. यानंतर या कामांसाठी अंतिम कंत्राटदार निश्चित होणार आहे. यानंतर याला स्थायी समितीत मान्यता दिली जाईल आणि त्यानंतर कंत्राटदाराला प्रत्यक्ष वर्क ऑर्डर दिली जाईल.

15-20 दिवसांची प्रक्रिया

या सर्व प्रक्रियेला 15-20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. यानंतर सरस्वती टॉकीजजवळील जागेवर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दि. 7 अथवा 8 पासून हे काम सुरू होईल, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. यामुळे तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, नगरविकास विभागाने आज या योजनेसाठी स्वंतत्र लेखाशीर्ष (बजेट हेड) सुरू केले. स्वतंत्र बजेट हेड असल्याने ही योजना पूर्ण होईपर्यंत दरवर्षी निधी मिळण्यास फार अडचण येणार नाही. या योजनेसाठी लागणार्‍या निधीसाठी प्रत्येकवेळी वित्त विभागाची मान्यता घेणे, त्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया करणे आदी प्रशासकीय प्रक्रिया कमी होणार आहेत. यामुळे वेळेवर निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.