Thu, Apr 25, 2019 03:50होमपेज › Kolhapur › पाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

पाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:24AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

गेले अनेक दिवस सुरूच असलेल्या जयंती नाल्यातील ड्रेनेजलाईन दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. दस्तुरखुद्द आयुक्‍तांनी भेट देऊन, सूचना करूनही अधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. त्यानंतरही काम संथगतीनेच सुरू असल्याने अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर व जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना आयुक्‍त  डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी आढावा बैठकीत चांगलेच झापले. त्यानंतर दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या. दरम्यान, वर्कशॉप विभागप्रमुख रावसाहेब चव्हाण यांनाही कामातील दिरंगाईमुळे पाच हजारांचा दंड आयुक्‍तांनी केला आहे.

महापालिकेत सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर आढावा बैठक झाली. त्यात आयुक्‍तांनी गेल्या काही दिवसांतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर असल्याने जयंती नाल्यातील तुटलेल्या ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न आयुक्‍तांनी गांभीर्याने घेतला आहे. त्याविषयी पाटणकर व कुलकर्णी यांना ते वेळोवेळी पाहणी करून सूचना देतात.

परंतु, जलअभियंता कुलकर्णी यांच्या कामात काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे आयुक्‍तांनी कुलकर्णी यांना आढावा बैठकीत चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यासह पाटणकर यांना कारवाई का करू नये, यासाठी नोटीस बजावली. चव्हाण यांचीही आयुक्‍तांनी चांगलीच कानउघाडणी केली. इस्टेट विभागाच्या कामाबाबतही आयुक्‍तांनी असमाधान व्यक्‍त केले.