Sat, Jul 20, 2019 22:01होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये औषधटंचाई

सीपीआरमध्ये औषधटंचाई

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:34PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

गोरगरीब जनतेचा आधारवड असणार्‍या सीपीआरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून औषधांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. रुग्णांची गौरसोय टाळण्यासाठी सीपीआर प्रशासनाने जिल्हा परिषद आणि लगतच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांशी औषधासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. त्यातच भटकी कुत्री नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. रेबीजमुळे तब्बल पाच जणांचा बळी गेला आहे. आतातर डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले असून, अख्खा जिल्हाच भयभीत झाला आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात विविध प्रकारच्या औषधांची टंचाई जाणवत आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करून उपचार घ्यावे लागत आहेत. 

नुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे सीपीआरबाबत रुग्णांच्या मनात द‍ृढविश्‍वास आहे. येथे दररोज 700 ते 1000 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यामधील काही रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जातेे; पण सध्या औषधांची टंचाई असल्याने अनेक अडचणी येत आहेत. छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागण्यार्‍या साहित्याचादेखील तुटवडा आहे. त्यामुळे नागरिक डॉक्टर आणि कर्मचार्‍यांशी हुज्जत घालतात.सीपीआरच्या प्रसूती विभागातदेखील प्रसूतीसाठी लागणार्‍या औषधांची टंचाई आहे. 

शासनाची हापकीन संस्था राज्यातील रुग्णालयांना 15 ऑगस्ट 2017 पासून औषधपुरवठा करून देणार होती. औषध खरेदीची जबाबदारी या संस्थेनेच घेतल्याचे बोलले जाते; पण अद्याप एकही गोळी हापकीन संस्थेने सीपीआरला दिलेली नाही. त्यामुळेच सीपीआरमध्ये विविध प्रकारची औषधटंचाई जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी चक्‍क सीपीआर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि शेजारील जिल्ह्यांतील आरोग्य विभागाकडे हात पसरले आहेत. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेने काही प्रमाणात सीपीआरला औषधे दिली आहेत; पण इतर जिल्ह्यांनी औषधे देण्यास टाळले आहे. रुग्णसेवेबरोबरच सीपीआर प्रशासनाला औषधटंचाईचे ‘टेन्शन’ आले आहे. औषध खरेदीचे अधिकार सीपीआर प्रशासनाला मिळणे गरजेचे आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकाच औषधसाठा सीपीआरमध्ये शिल्लक आहे.

औषध दुकानांमध्ये गर्दी 

सीपीआरमध्ये औषधांची टंचाई असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरून औषधे आणून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे औषध दुकानांच्या बाहेर गर्दी दिसून येते. डॉक्टरांनी औषधांची चिठ्ठी लिहून दिली की, रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हुज्जत घालतात.