Thu, Jul 18, 2019 12:28होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 2:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या सौ. शोभा पंडितराव बोंद्रे विजयी झाल्या. त्यांनी ताराराणी आघाडीच्या सौ. रूपाराणी संग्राम निकम यांचा 33 विरुद्ध 44 अशा मताधिक्क्याने पराभव केला. शिवसेनेच्या सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे (निल्ले) यांनी निवडणुकीतून माघार घेतली. उपमहापौर पदासाठी झालेल्या तिरंगी निवडणुकीत राष्ट्रवादीचे महेश सावंत यांनी भाजपचे कमलाकर भोपळे यांचा 44 विरुद्ध 33 असा पराभव केला. शिवसेनेच्या अभिजित चव्हाण यांना शून्य मते मिळाली. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिले.

महापौर पदासाठी सकाळी अकरा वाजता निवडणूक सुरू झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी दाखल झालेले उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे दिले. अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध ठरले. सकाळी 11.06 पासून 11.21 वाजेपर्यंत माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. या कालावधीत 11.10 वाजता उत्तुरे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र खेमणार यांना दिले. त्यामुळे बोंद्रे व निकम यांच्यात थेट लढत झाली. सुरुवातीला निकम यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यांना 33 मते मिळाली. बोंद्रे यांच्यासाठी मतदान घेतल्यावर त्यांना 44 मते मिळाली. पीठासन अधिकारी खेमणार यांनी सकाळी 11.47 वाजता महापौरपदी बोंद्रे विजयी झाल्याचे जाहीर केले.

उपमहापौर पदासाठी सकाळी 11.50 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेच्या चव्हाण यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता. परंतु, त्यांनी स्वतः उपस्थित राहून विहीत नमुन्यात अर्ज भरून न दिल्याने त्यांचा अर्ज तसाच राहिला. परिणामी, उपमहापौर पदासाठी तिरंगी लढत झाली. सुरुवातीला शिवसेनेच्या चव्हाण यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. स्वतः चव्हाण हेही सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांना शून्य मते मिळाली. भाजपचे भोपळे यांना 33 तर राष्ट्रवादीच्या सावंत यांना 44 मते पडली. पीठासन अधिकारी खेमणार यांनी सावंत यांना विजयी घोषित केले.    
प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास

प्राधान्य : बोंद्रे

कोल्हापूर शहरात सध्या डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. महापालिका आरोग्य विभागाची बैठक घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात येतील. पावसाळा असल्याने नालेसफाईसाठी सूचना दिल्या जातील. थेट पाईपलाईनसह शहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असे नूतन महापौर शोभा बोंद्रे यांनी पत्रकारांना सांगितले.महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घेतले आहे. परंतु, शिवसेनेनेच महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली होती. फोडाफोडीच्या राजकारणामुळे निवडणुकीत रंगत भरली होती. भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसारखेच महापौर निवडणुकीतही बिन आवाजाचा बॉम्ब फोडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीविषयी शेवटच्या दिवसापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मतदान होईपर्यंत काय होईल आणि कोण जिंकेल, हे ठामपणे सांगू शकत नव्हते. मात्र, शिवसेनेने गुरुवारी रात्री अचानक घूमजाव करत निवडणुकीतून माघार घेण्याचा आणि तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

शिवाजी पेठेला महापौर पदाचा दहाव्यांदा मान

शिवाजी पेठेला दहाव्यांदा महापौर पदाचा मान मिळाला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या कुटुंबात दोनवेळा महापौरपद होते. यापूर्वी विलासराव सासने (1982-83) दिनकर पाटील (1988-89), भीकशेट पाटील (1990-91), प्रल्हाद चव्हाण (1996-97), बाजीराव च्हाण (2003), सौ. सई खराडे (2005 ते 2008), उदय साळोखे (2008-09) सागर चव्हाण (2009-10), सौ. सुनीता राऊत (2013-14). त्यानंतर आता सौ. शोभा बोंद्रे यांना महापौर पदाचा मान मिळाला आहे. सौ. बोंद्रे या सौ. खराडे यांच्या भावजय आहेत. माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या त्या आई आहेत. माजी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे हे 1961 साली कोल्हापूरचे नगराध्यक्ष झाले. त्यांना नगराध्यक्ष करण्यात ‘पुढारी’चे संस्थापक संपादक कै. डॉ. ग. गो. जाधव यांचा सिंहाचा वाटा होता. श्रीपतराव बोंद्रे यांच्यानंतर बोंद्रे घराण्यात यापूर्वी महिपतराव ऊर्फ पापा बोंद्रे यांच्या कन्या सई खराडे यांना महापौरपद मिळाले होते. त्यानंतर आता सौ. शोभा बोंद्रे यांना महापौरपद मिळाले आहे.