Thu, Apr 25, 2019 18:37होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे शोभा बोंद्रे  

महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे शोभा बोंद्रे  

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 11:09PMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या वतीने सौ. शोभा बोंद्रे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने महापौरपदाची उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांत मोठी रस्सीखेच सुरू होती. सात नगरसेविकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी केली होती. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी अखेर बोंद्रे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले. 

महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे आरक्षण आहे. उमेदवारीसाठी सात नगरसेविका इच्छुक होत्या. बोंद्रे यांच्यासह सौ. उमा बनछोडे, सौ. निलोफर आजरेकर, श्रीमती दीपा मगदूम, सौ. जयश्री चव्हाण, सौ. प्रतीक्षा पाटील, सौ. इंदुमती माने आदींनी शनिवारी मुलाखती दिल्या होत्या; परंतु आमदार पाटील यांनी बोंद्रे यांना महापौर करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत बंद पाकिटातून बोंद्रे यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज येईल. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने महापौरपदासाठी बोंद्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल. महापौरपदासाठी 25 मे रोजी निवडणूक होणार आहे. 

काँग्रेस - राष्ट्रवादीतील सत्तेच्या वाटाघाटीनुसार यंदाचे महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतून सचिन पाटील व महेश सावंत इच्छुक आहेत. वर्षभरासाठी पद असेल तरच पाटील हे उपमहापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे कुणाला उमेदवारी देणार? हे सोमवारीच स्पष्ट होईल. काँग्रेस - राष्ट्रवादी नगरसेवकांना व्हीप लागूमहापौरपदाची निवडणूक अत्यंत ईर्षेची बनली आहे. त्यामुळे कोणीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. दगाफटका होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केलेल्या अफजल पिरजादे यांना काँग्रेसच्या नगरसेवकांनी जाऊन व्हीप दिला. तर दुसरे नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांना व्हीप लागू केलेला नाही. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना यापूर्वीच व्हीप लागू करण्यात आला आहे. पक्षाने ठरविलेल्या उमेदवारालाच मतदान करावे यासाठी नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर; संभ्रमावस्था...

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काठावरचे बहुमत आहे. सत्ताधारी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक संख्येचा फरक आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार नगरसेवकांना सत्तेत सहभागी करून घेतले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहकार्य करण्याच्या अटीवर शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद बहाल करण्यात आले आहे; परंतु महापौरपदाची निवडणूक अत्यंत ईर्षेची बनली असूनही रविवारी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीला शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. त्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेविषयी पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.