Mon, Jun 17, 2019 02:21होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी बोंद्रे, निकम, उत्तुरे रिंगणात

महापौरपदासाठी बोंद्रे, निकम, उत्तुरे रिंगणात

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने सौ. शोभा बोंद्रे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी ताराराणी आघाडीतून सौ. रूपाराणी निकम यांनी तर शिवसेनेतून सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी अर्ज भरल्याने तीन उमेदवार रिंगणात आले आहेत. शिवसेनेने अर्ज भरल्याने नाट्यमय वळण लागत निवडणूक रंगतदार बनणार आहे. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीमधून महेश सावंत, विरोधी भाजपकडून कमलाकर भोपळे तर शिवसेनेतून अभिजित चव्हाण यांनी अर्ज भरले. महापालिकेत नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सर्वांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (25 मे) निवडणूक होणार आहे.   

काँग्रेसमधून महापौरपदासाठी सात नगरसेविका इच्छुक होत्या. त्यापैकी बोंद्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गटनेता शारंगधर देशमुख यांना दिल्या. बोंद्रे यांच्या अर्जाला अर्जुन माने सूचक असून, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर अनुमोदक आहेत. उमपहापौरपदासाठी सावंत व सचिन पाटील इच्छुक होते. त्यापैकी सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी गटनेता सुनील पाटील यांना केली. सावंत यांच्या अर्जाला सौ. सरिता मोरे सूचक असून, शारंगधर देशमुख अनुमोदक आहेत. 

भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची नावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांनी निश्‍चित केली. ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी सौ. स्मिता माने, सौ. सुनंदा मोहिते व निकम इच्छुक होत्या. तिघींचेही अर्ज भरले होते. नेत्यांनी निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना गटनेता सत्यजित कदम यांना केली. त्यांच्या अर्जाला राजसिंह शेळके सूचक असून, स्थायी सभापती आशिष ढवळे अनुमोदक आहेत. उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेल्या भोपळे यांना सूचक शेखर कुसाळे, तर अनुमोदक भाग्यश्री शेटके आहेत. शिवसेनेच्या उत्तुरे यांच्या अर्जाला अभिजित चव्हाण सूचक, तर नियाज खान अनुमोदक आहेत. चव्हाण यांच्या अर्जाला खान सूचक व उत्तुरे अनुमोदक आहेत. 

शिवसेनेच्या उमेदवारीचाभाजप-ताराराणीला फायदा...

महापौर, उमहापौर निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची चार मते सत्ताधार्‍यांना मिळणार नसल्याने त्याचा फायदा भाजप-ताराराणी आघाडीला होईल, असे स्थायी सभापती आशिष ढवळे व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच आम्ही घोडेबाजार करणार नाही. परंतु, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनेक नगरसेवक नाराज असून, आम्हाला मतदान करण्यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी स्वतःहून भाजपला मतदान केले. महापौरपदाच्या निवडणुकीतही भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना त्याच धर्तीवर मतदानासाठी विनंती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपकडे स्थायी सभापतिपद आल्याने ताराराणी आघाडीला महापौरपदाची उमेदवारी दिल्याचा खुलासाही त्यांनी केला.    

पिरजादे, चव्हाण यांची वेगवेगळी भूमिका...

स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी बंडखोरी करून भाजपला मतदान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार अपात्र ठरविण्यासाठी कारवाईचे पावले उचलली आहेत. तेव्हापासून पिरजादे व चव्हाण हे राष्ट्रवादीच्या पार्टी मिटिंगलाही जात नाहीत. परंतु, महापौरपदाची निवडणूक चुरशीची असल्याने काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दोघांनाही काँग्रेसला सहकार्य करावे, असे सांगितले आहे. त्यानुसार पिरजादे हे काँग्रेसच्या बोंद्रे यांना मतदान करणार आहेत. परंतु, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. चव्हाण यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नगरसेवक रविवारी गोव्याला सहलीसाठी रवाना झाले होते. बोंद्रे यांचा उमदेवारी अर्ज भरल्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा उर्वरित नगरसेवक गोव्याला गेले. भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवकही दोन दिवसांनी सहलीवर जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक होईपर्यंत महापालिकेत नगरसेवक नसणार आहेत. 

बोंद्रे यांना उमेदवारीचे वृत्त सर्वप्रथम ‘पुढारी’त

महापालिकेत कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. साहजिकच या काँग्रेसमधून महापौरपदासाठी उमेवादीर मिळावी यासाठी अनेक नगरसेविका इच्छुक होत्या. त्यासाठी सातही नगरसेविकांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यामुळे पाटील यांनाही महापौरपदासाठी नाव निश्‍चित करण्यासाठी कसरत करावी लागत होती. दैनिक पुढारीमध्ये 16 एप्रिलला काँग्रेसमधून सौ. शोभा बोंद्रे यांनाच उमेदवारी मिळणार असे वृत्त देण्यात आले होते. अखेर काँग्रेसमधून बोंद्रे यांचेच नाव निश्‍चित करण्यात आले. त्याचे सर्वप्रथम वृत्त फक्त दैनिक पुढारीत सोमवारी प्रसिध्द झाले. पुढारीचे वृत्त तंतोतंत खरे ठरले.  

एक फोडला तर दहा फोडू : प्रा. जयंत पाटील

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्ही घोडेबाजार करण्याचा प्रश्‍नच येत नाही. परंतु, विरोधकांनी घोडेबाजाराचा प्रयत्न करू नये. विरोधकांनी आमच्यातील एक नगरसेवक फोडला तर आम्ही त्यांचे दहा नगरसेवक फोडू, असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच पाटील यांच्यासह काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कोणताही नगरसेवक नाराज नाही. परिणामी, फुटीचा धोका नाही. महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांना एकत्रित बसवूनच एकेका उमेदवाराचे नाव नेत्यांनी निश्‍चित केले आहे. शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी त्यांना माघार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदानासाठी विनंती केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर उपस्थित होते.