होमपेज › Kolhapur › ‘एफआरपी’तून कपात  केलेले 500 रु. त्वरित द्या

‘एफआरपी’तून कपात  केलेले 500 रु. त्वरित द्या

Published On: Feb 07 2018 2:22AM | Last Updated: Feb 07 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

साखर कारखानदारांनी एफआरपीतून कपात केलेले 500 रुपये त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत, अशा कारखानदारांवर कारवाई करावी, अन्यथा  याच मशालीने साखर सहसंचालक कार्यालय भस्मसात करू, असा इशारा शिवसेनेने मंगळवारी साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा काढून शासन आणि साखर कारखानदारांना दिला.   

पद्मा चौक येथील कार्यालयापासून मोर्चास हातात मशाली घेऊन प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चास सुरुवात झाली. अयोध्या चौक, फोर्ड कॉर्नरमार्गे मोर्चा साखर संचालक कार्यालयावर आला. पोलिसांनी बॅरिकेट लावून मोर्चा अडविला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘ऊस दर आमच्या हक्‍काचा नाही कुणाच्या बापाचा’, ‘एफआरपी कमी करणार्‍या कारखानदारांचा धिक्‍कार असो’, ‘भाजप सरकारचा, सहकार मंत्र्यांचा धिक्‍कार असो’ आदींसह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून अधिकार्‍यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करावी. शेतकरी संकटात असताना साखरसम्राट मात्र मन मानेल त्या पद्धतीने निर्णय घेत आहेत. 

एफआरपी कमी करण्याचा अधिकार  साखरसम्राटांना कोणी दिला, असा संतप्‍त सवाल करून अशा साखर सम्राटांवर सरकारने फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी  करण्यात आली. 
काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते हल्‍लाबोल आंदोलन करीत आहेत. मात्र, एफआरपीतून 500 रुपये कमी केल्याबद्दल एकही शब्द काढत नाहीत. हिंमत असेल तर या नेत्यांनी कोल्हापुरात आंदोलन करून हे पैसे मिळवून द्यावेत, असे आव्हान जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. शेतकर्‍यांचे नेते म्हणविणारे खासदार शेट्टी आता गप्प का? त्यांची तलवार म्यान का, असा संतप्‍त सवाल पवार यांनी केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

प्रतिटन 2500 ते 2600 रुपये एफआरपी आणि चारशे ते पाचशे जादा असे सूत्र ठरविण्यात आले असताना आता मात्र साखर दर कमी झाल्याचा कांगावा करून वरील 500 रुपये देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे. 15 डिसेंबर 2017 पर्यंत गाळप झालेल्या उसास एफआरपी दिली. त्यानंतर प्रतिटन 500 रुपये कपात केली जात आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे संग्रामसिंह कुपेकर यांनी सांगितले.

मागण्यांचे निवेदन आणि मशाल साखर उपसंचालक दिग्विजय राठोड यांना देण्यात आले. राठोड यांनी संबंधित मागण्या साखर आयुक्‍तांना कळविण्यात येतील आणि त्यांच्या आदेशानुसार साखर कारखानदारांवर कारवई करू, असे आश्‍वासन दिले. 

राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 5 नोव्हेंबर रोजी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत एफआरपीचा दर ठरला आहे. यावेळी खा. राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. मात्र, नोव्हेंबरनंतर साखरेेचे दर उतरले. त्यामुळे साखर कारखानदारांनी ठरलेली रक्‍कम देण्यास असमर्थतता दर्शविली आहे. साखरेचे दर वाढल्यावर जादा दर देतात का, सह उत्पादनाचे दर कमी झालेले नाहीत मग एफआरपी कमी का? अशा कारखानदारांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. 

जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, दुर्गेश लिंग्रस शिवाजी जाधव,  तानाजी आंग्रे, प्रभाकर खांडेकर, प्रा. शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, मधुकर पाटील, साताप्पा भवान, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.