Sat, Feb 16, 2019 16:46होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे; शिवसेनेचे आंदोलन  

कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे; शिवसेनेचे आंदोलन  

Published On: Dec 21 2017 5:36PM | Last Updated: Dec 21 2017 5:36PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणी सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या पायर्‍यांवर शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी सहा जिल्ह्यातील नागरिक करीत आहे. यासंदर्भात सरकारने सकारात्मक प्रयत्न केला होता. परंतु काही लोकांनी हे खंडपीठ पुणे येथे पळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा शिवसेना आमदारांनी दिला. २०१३ मध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांनी ५५ दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आत्मक्लेष आंदोलन केले होते. एक डिसेंबर २०१६ रोजी वकिलांनी लाक्षणिक संप पुकारला होता. 

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. सरकारने खंडपीठ द्यावे, याकरीता प्रयत्न केले. परंतु, खंडपीठ स्थापनेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तरी शासनाने त्वरित खंडपीठ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदारांनी केली. आंदोलनात डॉ. सुचित मिणचेकर, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके, अजय चौधरी आदी सहभागी झाले होते.