Tue, Apr 23, 2019 18:22होमपेज › Kolhapur › सर्वांचा विकास हेच शिवरायांचे विचार : शाहू महाराज

सर्वांचा विकास हेच शिवरायांचे विचार : शाहू महाराज

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

सर्वांचा विकास हाच विचार छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी जीवनभर अंगीकारला असून, याच विचाराने शिवाजी चौक नव्या पिढीला स्फूर्तीदायक ठरेल, असा विश्‍वास शाहू महाराज यांनी व्यक्‍त केला. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक  सुशोभीकरण समितीतर्फे आयोजित शिवाजी चौक सुशोभीकरणाच्या भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सौ. हसिना फरास होत्या. 

शाहू महाराज म्हणाले, चौक सुशोभीकरणास सुरुवात हा दिवस ऐतिहासिक ठरेल. निधीविना काम थांबणार नाही, याची खबरदारी घेऊन अगोदरच संपूर्ण निधी महापाालिकेकडे वर्ग केला आहे. या कामासाठी आ. क्षीरसागर यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. काळ बदलत आहे. देशात नवनवीन ऊर्जा निर्माण होत आहे. चांगला आणि वेगाने विकास होत असून, या काळात छत्रपती शिवरायांच्या विचाराने एकत्र येत आहोत, याचे कौतुक आहे; मात्र छत्रपती शिवरायांचे विचार लक्षात घेऊनच कार्य केले पाहिजे. घोषणा देताना या विचारांची आठवण ठेवली पाहिजे. साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांचे विचार प्रेरणादायी ठरतात. याचा  आदर्श ठेवून शंभर वर्षे टिकेल, असे आपले काम झाले पाहिजे.

आ. क्षीरसागर म्हणाले, या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम व्हावे ही मनापासून इच्छा होती. सर्व घटकांच्या मदतीने हे काम आता मार्गी लागत आहे, याचा आनंद आहे.  काम दर्जेदार व्हावे यासाठी समितीच्या वारंवार बैठका घेतल्या. सर्वांना विश्‍वासात घेऊन नियोजन केले. 33 गडकोटांतील माती-दगड, जिल्ह्यातील 12 नद्यांचे पाणी आणि शहरातील तालमींतील माती या पायाभरणी समारंभासाठी उपलब्ध केली आहे.

विविध जाती-धर्मांना एकत्र करून लोकोत्सवाच्या माध्यमातून हे काम सुरू झाले आहे. देशातील एक नंबरचा पुतळा होईल, याची खबरदारी घेतली आहे. भविष्यात या संपूर्ण चौकाचे रूप पालटले जाईल. एक प्रकारे उत्सव केंद्र म्हणून हा चौक विकसित करण्याचे ध्येय आहे. अशा वेळी या चौकाचे आणि पुतळ्याचे पावित्र्य राखण्याचे काम आपण सर्व जण करू या.  दारू पिऊन कठड्यास हात लावणार नाही, अशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.