Thu, Jun 27, 2019 02:23होमपेज › Kolhapur › आतातरी शहाणे होतील का ‘अडथळेखोर’

आतातरी शहाणे होतील का ‘अडथळेखोर’

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:27PMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

जिल्ह्याच्या विकासासाठी एखादी योजना आली की, लगेच त्यात त्रुटी शोधायच्या, काम गतीने कसे पूर्ण होईल हे पाहण्याऐवजी, त्यात अडथळेच अधिक निर्माण करायचे, काहीजणांची प्रसिद्धीची हौस, तर काहीजणांना लागलेली ढपल्याची चटक, यामुळेच कोल्हापुरात हे घडत असल्याचा सर्वसामान्यांकडून आरोप होऊ लागला आहे. ऊठसूट कामे बंद पडणार्‍या ठराविक सामाजिक कार्यकर्त्यांनी आतातरी शहाणे व्हावे, असे मत सर्वसामान्यांतून व्यक्‍त होऊ लागले आहे.

पर्यायी शिवाजी पुलाचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू असती, तर 26 जानेवारीच्या रात्रीचा भीषण अपघात कदाचित टळलाही असता. सध्या वापरात असलेल्या 140 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचा दगडी कठडा ठिसूळ होत चालल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. दगडावर दगड रचून बांधलेल्या या कठड्यातील जुन्या काळातील चुना किंवा इतर मिश्रण मृत झाल्याने त्याचे दगड आपोआप निखळू लागले आहेत. अशा या ठिसूळ होत चाललेल्या दगडी कठड्याला धडक पेलली नाही आणि तो लगेच तुटल्याने बस नदीत कोसळल्याचे निष्कर्ष निघाल्याने नव्या पुलाची गरज अधोरेखित झाली आहे. 

नवा पर्यायी पूल रुंद आहेच, शिवाय त्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग आहेत. या पादचारी मार्गांच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे भक्‍कम कठडे आहेत. त्यामुळे जरी बसची धडक बसली असती, तरी पहिला कठडा तुटला असता; पण पादचारी मार्गावरून पुढे जाऊन दुसरा कठडा तोडून बस नदीत कोसळणे शक्यच नव्हते, असे अधिकार्‍यांचे ठाम मत आहे. नव्या पुलाचा अवघा 20 टक्के भाग अपूर्ण आहे. पुलाच्या बांधकामाविरोधात आंदोलन झाले नसते अथवा मंत्रालयापर्यंत निवेदने गेली नसती, तर हे काम गेल्याच वर्षी पूर्ण झाले असते. 

पुरातत्त्व खात्याची मंजुरी आवश्यक असल्याचा मुद्दा बरोबर असला, तरी ज्या ठिकाणी पूल बांधला जातोय तेथे कोणतेही पुरातत्त्व अवशेष नाहीत. त्याच्यापासून पुढे रस्त्याच्या पलीकडे सुमारे 200 मीटरवर पुरातत्त्व अवशेष सापडणारी ब्रह्मपुरी आहे. पुलाची शेवटची कमान संपल्यानंतर पंचगंगेच्या काठावरील दगडावरच तो टेकवला जाणार आहे. पुढे असणारा एक शाहूकालीन पाण्याचा हौद होता; पण तो हटविणे फारसे अवघड नव्हते, असेही सांगितले जात आहे.

पुरातत्त्व खात्याच्या मंजुरीची आडकाठी निर्माण करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पाच-सात झाडांसाठी टाहो फोडणारे पर्यावरणवादी यांच्यासह ऊठसूट आंदोलनाचे हत्यार उपसणार्‍यांनी आता शहाणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. अशा आंदोलनांमुळेच पर्यायी शिवाजी पुलाचे काम रखडल्याचे शासकीय यंत्रणांकडून स्पष्टपणे सांगितले जात आहे. विकासकामे करताना कायदा पाळला पाहिजेच; पण तो कायदा जर अनेकांच्या जीवावर उठत असेल, तर त्यात दुरुस्ती केली पाहिजे, असाही मतप्रवाह आहे.