Wed, Jul 17, 2019 18:33होमपेज › Kolhapur › शिवाजी पूल २२ ला बंद करणार

...अन्यथा शिवाजी पूल २२ ला बंद करणार

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 1:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

काहीही करा, कसेही करा; पण पर्यायी पुलाचे बांधकाम सोमवार दि. 21 पर्यंत सुरू करा, अन्यथा मंगळवारी (दि. 22) शिवाजी पूल वाहतुकीसाठी भिंत घालून बंद करू, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना दिला. पुलाचे काम पावसाळ्यात करणे शक्य नाही, हे माहीत असतानाही ‘वर्क ऑर्डर’ काढून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची राष्ट्रीय महामार्ग विभागाने बदनामी का केली, असा सवाल करत याप्रश्‍नी जिल्हाधिकारी कार्यालयालाही टाळे ठोकू, असेही समितीने सांगितले.

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत सोमवार दि. 14 रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ‘वर्क ऑर्डर’ काढली. मात्र, ठेकेदार कंपनीने ती स्वीकारली नाही. वस्तुस्थितीजनक तांत्रिक कारणे देत पावसाळ्यात हे काम करणे शक्यच नसल्याचे कंपनीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्रच दिले. यामुळे पर्यायी पुलाचे बांधकाम रेंगाळणार हे समजताच, कृती समितीने संतप्त भावना व्यक्त केल्या.

पन्हाळकरांना विचारला जाब

समितीने गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात जाऊन उपअभियंता रमेश पन्हाळकर यांची भेट घेतली. ‘वर्क ऑर्डर’ काढली; पण ठेकेदार काम करण्यास असमर्थता दर्शवत आहे, या सर्व प्रकारचा पन्हाळकर यांना जाब विचारण्यात आला. पावसाळ्यात काम करता येते की नाही, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे की नाही, याची शहानिशा का केली नाही? जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी जनतेच्या हितासाठी हा पूल तातडीने पूर्ण व्हावा याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून पर्यायी पुलाच्या बांधकामाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे मंजुरी देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यातूनच अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याबाबत वर्क ऑर्डर काढण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर आपण या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास का आणून दिल्या नाहीत, त्यांना तोंडघशी पाडण्याचे, बदनाम करण्याचे काम आपण केले आहे, असा आरोप समितीने केला.

पाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही ः कंपनी प्रतिनिधी

ज्या कंपनीला ठेका दिला, त्याच्या प्रतिनिधींना बोलवा, अशी मागणी समितीने केली. त्यावर कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड कार्यालयात आले. त्यांनी समितीसमोर वस्तुस्थिती मांडली. कंपनी हे काम करायला तयार आहेच; पण तांत्रिकदृष्ट्या ते पावसाळ्यात करता येणार नाही. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, याकरिता आम्ही वर्षभर विभागाकडे पाठपुरावा करत आहोत; पण त्याला विभागाकडून प्रतिसाद दिला जात नाही. या कामाची जी निविदा काढण्यात आली आहे, त्यात पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर पुलाचे काम सुरू करायचे आहे, ती परवानगी मिळाली नाही तर काम रद्द केले जाईल, अशी अट घातली आहे. तसेच वर्क ऑर्डरनुसार काम सुरू केले आणि ते रेंगाळले, तर विभागाकडून कारवाई होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर काम करू शकत नसल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.

या पुलाच्या रत्नागिरीकडील बाजूचे काम करता येईल का, अशी विचारणा समितीने केली, त्यावर लाड यांनी, त्या बाजूला कमी काम शिल्लक आहे आणि ते केले, तर नदीपात्रात जाणारा रस्ता बंद होतो, त्यामुळे ते कामही करता येणे शक्य नसल्याचे सांगितले. पावसाळ्यातही काही यंत्रसामुग्री वापरून हे काम करता येईल का, याबाबतही लाड यांना विचारण्यात आले, त्यावर हा पूल व्ही टाईपचा आहे, त्याला जाग्यावर सेंट्रिंगचे साहित्य लावून स्लॅब टाकावा लागणार आहे. यामुळे आहे त्या डिझाईननुसार काम करायचे असल्यास ते शक्य नाही. हे टेंडर बी वन टाईप आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काही बदल करता येत नाही, जे डिझाईन दिले आहे, त्यानुसारच काम करावे लागते. यामुळे पावसाळ्यातही काम करता  येईल, यादृष्टीने उर्वरित कामाचे डिझाईन करावे लागेल आणि त्याच्या वाढीव खर्चाला मंजुरी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर समितीने वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोला, याबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठक लावा, असे पन्हाळकर यांना सांगितले. या पुलाचे डिझाईन बदलले तरी तशी यंत्रसामुग्री असणारा ठेकेदार शोधावा लागेल आणि त्यानंतरच काम सुरू होईल, असे सांगण्यात आल्यानंतर समिती आणखी संतप्त झाली. काय करायचे ते तुम्ही करा, पुलाचे बांधकाम सुरू झाले पाहिजे, अन्यथा तुमचे कार्यालय जाग्यावर ठेवणार नाही, असा इशारा यावेळी समितीने दिला.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी आश्‍वासन दिले, त्यानुसार तुमच्याशी चर्चा करून वर्क ऑर्डर  काढली; पण तुम्ही त्यांचीही फसवणूक केली. तुमच्यामुळे ते बदनाम होत आहेत. खोटे आश्‍वासन दिले म्हणून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करू या का, असा सवालही पन्हाळकर यांना करण्यात आला. या सर्व प्रकाराला आपला विभागच जबाबदार असून, त्याची भरपाई आपल्या विभागानेच केली पाहिजे, असे सांगत वर्क ऑर्डर काढल्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित केले होते; पण आता ते पुन्हा सुरू करत आहोत. येत्या मंगळवारी सकाळी 11 वाजता शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल. तत्पूर्वी महाराणा प्रताप चौकात सर्व कार्यकर्ते, नागरिक एकत्र येतील आणि तेथून ते पुलावर जातील, शिवाजी पुुलावर भिंत बांधली जाईल, असे समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे यांनी सांगितले. यासह जिल्हाधिकारी कार्यालयालाही टाळे ठोकले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, दिलीप पवार, संभाजी जगदाळे, रमेश मोरे, चंद्रकांत बराले, दिलीप माने, महादेव पाटील, अशोक भंडारे, सुनील पाटील, तानाजी पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रणजित आयरेकर, रणजित काकडे, सचिन बिरंजे, फिरोज खान आदींसह शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.