Thu, Jul 18, 2019 02:50होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावर मोटारींची धडक : वाहतूक ठप्प

शिवाजी पुलावर मोटारींची धडक : वाहतूक ठप्प

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मद्यधुंद मोटारचालकाने ‘गोकुळ’चे माजी चेअरमन दिलीप पाटील यांच्या मोटारीला समोरून धडक दिली. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी पुलावर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मद्यधुंद चालक अभिजित आनंदा सावंत (वय 35, रा. सम्राटनगर) याला ताब्यात घेतले. अपघातानंतर पुलावरील वाहतूक एक तास खोळंबली.

दिलीप पाटील हे मुलगा रणजितसोबत प्रयाग चिखलीतील नातेवाईकांकडे गेले होते. तिकडून शिरोळला परतत असताना शिवाजी पुलावर समोरून येणार्‍या मोटारीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. मोठा आवाज झाल्याने मोठी गर्दी जमली. समोरून धडक देणार्‍या मोटारीचा चालक अभिजित सावंत मद्यधुंद असल्याचे समजताच जमाव संतप्‍त बनला. पोलिसांनी अभिजित सावंतला ताब्यात घेतले.

ट्रॅव्हलर अपघाताची आठवण

अभिजित सावंत हा भरधाव वेगात पन्हाळ्याच्या दिशेने चालला होता. त्याच्या मोटारीत एक लहान मुलगीही होती. त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पाटील यांच्या मोटारीला धडक दिली. पाटील यांची मोटार समोर नसती तर कदाचित 26 जानेवारीला शिवाजी पुलावरून कोसळलेल्या ट्रॅव्हलरसारखी परिस्थिती झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

वाहतुकीचा खोळंबा

शिवाजी पुलाच्या मध्यभागी हा अपघात झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. स्थानिक तरुणांनी अभिजित सावंत यांची बंद पडलेली मोटार उलट्या दिशेने ढकलत स्मशानभूमीच्या कमानीपर्यंत आणली. यानंतर वाहतूक सुरू झाली.