Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Kolhapur › पर्यायी शिवाजी पुलाच्या डिझाईनचा मार्ग मोकळा

पर्यायी शिवाजी पुलाच्या डिझाईनचा मार्ग मोकळा

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

डिझाईनअभावी रखडलेले पर्यायी पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी दिलेले डिझाईन योग्य असून, त्याद्वारे पावसाची परिस्थिती पाहून काम सुरू करा, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिल्या. बुधवारी त्यांनी पर्यायी पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यामुळे लवकरच डिझाईनअभावी रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

पर्यायी पुलासाठी कोल्हापूरच्या दिशेला अबडमेंटचे काम करण्यात येत आहे. त्याकरिता पाया म्हणून स्लॅब टाकण्यात येणार आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आले होते. मात्र, उपअभियंत्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ते डिझाईन अंतिम झाले नाही. यामुळे पायासाठी स्लॅब टाकण्याचे काम ठप्प झाले होेते. या प्रकारावरून संबंधित उपअभियंत्यावर कारवाई करण्याची मागणीही करत कृती समितीने आंदोलन केले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर मुख्य अभियंता देशपांडे यांनी बुधवारी दुपारी पर्यायी पुलाच्या अबडमेंटसाठी खोदकाम केलेल्या जागेची पाहणी केली. खोदकाम केलेल्या ठिकाणचा भूगर्भस्तर चांगला आणि मजबूत आहे. या ठिकाणी माती आढळून असली, तरी त्याचे प्रमाण कमी असून सुमारे 80 ते 90 टक्के दगड आहे. मुरूम आणि माती असणार्‍या ठिकाणी ज्या पद्धतीने डिझाईन केले जाते, त्या पद्धतीने सुरक्षित डिझाईन या कामासाठी करण्यात आले आहे. यामुळे यापूर्वी दिलेल्या डिझाईनुसार काम करणे शक्य असल्याचा निर्वाळा देत देशपांडे यांनी पाऊस आणि ठेकेदारांची तयारी पाहून, काम सुरू करा, अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता निघोट, उपअभियंता संपत आबदार, ठेकेदार एन. डी. लाड आदी उपस्थित होते.