होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी

शिवाजी विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:33PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठास सरते वर्ष सकारात्मक आणि आत्मविश्‍वास वाढवणारे ठरले. कारण केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाच्या बत्तीस संस्थांच्या शॉर्टलिस्टमध्ये  शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला. पदार्थविज्ञान विषयाच्या संशोधनात विद्यापीठाचा जगभर लौकीक आहेच. आता आंतराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता प्रकल्पात विद्यापीठाचा समावेश झाला आहे. एकूणच गुणवत्तेत विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी यंदा दिसून आली.  

शिवाजी विद्यापीठाने पदार्थविज्ञान शाखांतील संशोधनात सातत्याने जागतिक पातळीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. यंदाही यामध्ये सरासरी कायम राहिली. जगभरातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. याचा विचार करून केंद्र सरकारने शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये  देशातील वीस विद्यापीठांची निवड करून त्यांना पाच वर्षांसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या उपक्रमातील  शॉर्टलिस्टमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. एकप्रकारे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर शिक्‍कामोर्तब आहे. 

यासह यंदा अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत ‘सुटा’ची पिछेहाट झाली तर विद्यापीठ विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. निवडणूक काळात ‘सुटा’चे जिल्हाध्यक्ष प्रा. रघुनाथ ढमकले यांना ‘सुटा’ने निलंबित केल्याने संघटनेतील बंड चांगलेच गाजले. ‘सुटा’तील प्रस्थापित विरुद्ध नवनेतृत्वांच्यातील धुसफूस यानिमित्ताने बाहेर आली. 

यंदा एप्रिलपासून नव्या विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याची सुरळीत अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकूणच शैक्षणिक गुणवत्तेबाबत चांगले चित्र असताना दुसर्‍या बाजूला विविध प्रश्‍नांसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, माजी सैनिक आदींनी प्रलंबित मागण्यांसाठी  आंदोलन केले. सकल मराठा संघटनेनेही बिंदूनामावलीनुसार कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. यावर्षी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. डी. टी. शिर्के यांनी पदभार स्वीकारला. 

जैवविविधतेत अव्वल

विद्यापीठ परिसरात 1200 हून अधिक मोर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जैवविविधतेच्या द‍ृष्टीने ही दिलासादायक गोष्ट आहे. तसेच  प्लास्टिकमुक्‍त परिसर ही संकल्पना प्रशासनाकडून यशस्वीपणे राबवली आहे.