Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Kolhapur › देश विकासासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान वापरावे

देश विकासासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान वापरावे

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जगासमोर प्रचंड लोकसंख्येचे आव्हान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या लोकसंख्येला आवश्यक असणार्‍या अन्‍न, ऊर्जा व सुविधांच्या नियोजनासाठी करायला हवा. हे नियोजन करताना शाश्‍वत विकास आणि अपारंपरिक ऊर्जा या दोन गोष्टींना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करावा, म्हणजे आपोआप देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. ए. एस. किरणकुमार यांनी सोमवारी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दीक्षांत समारंभात प्रा. किरणकुमार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात झालेल्या या शानदार समारंभासाठी विद्यार्थी, पालक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,  कुलसचिव  डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंदाच्या वातावरणाने विद्यापीठ कॅम्पस न्हाऊन निघाला होता. या बहारदार वातावरणात दीक्षांत समारंभास सुरुवात झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रमुख पाहुणे किरणकुमार यांच्यासह कुलगुरू डॉ. शिंदे आदींसह मान्यवरांचे आगमन ज्ञानदंडासह सभागृहात झाले. प्रा. किरणकुमार म्हणाले, मानवी विकासात शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. सध्याचे जग हे गतिमान आहे. या जगात आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. सतत शिका, हा मंत्र नव्या जगाचा नारा आहे. निसर्ग हा महान शिक्षक आहे. त्यामुळे निसर्गाकडून सतत शिकायला हवे. गरुडाच्या आकारापासून आपण एअरक्राफ्ट, तर शार्कपासून जहाजांची रचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निसर्गाची भाषा आपण शिकली पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. परंतु, मानवाचे भले करत असताना तंत्रज्ञानामुळे शोषण होत असेल, तर ते चुकीचे आहे.

विश्‍वगुरू ही ओळख द‍ृढ करा

भारत देशाला महान समृद्धीचा वारसा आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या देशाला पुन्हा गतवैभव प्राप्‍त करून द्यावे, तसेच विश्‍वगुरू ही जुनी ओळख नव्याने द‍ृढ करावी, असे आवाहन किरणकुमार यांनी केले. तंत्रज्ञानाविषयी अधिक विस्ताराने त्यांनी सांगितले की, वृक्षसंवर्धन, क्षारपड जमीन, किनारपट्टी व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज यासाठी सॅटेलाईटकडून मिळणारी माहिती महत्त्वाची ठरते. जल, जमीन, जंगलसंवर्धन या नैसर्गिक स्रोतांसाठी ही माहिती धोरणकर्त्यांना उपयोगी पडते. ‘नाविक अ‍ॅप’ या सहाय्याने सर्वच मच्छीमारांना वादळ-वार्‍याची माहिती सहज उपलब्ध झाली असल्याचे आपल्याला दिसून येईल.

खगोल  तंत्रज्ञानाचा वापर भारतीय उत्थानासाठी होत आहे. भारताने 104 सॅटेलाईट लाँच केले आहेत. प्रत्येक सॅटेलाईटचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मंगळयान मोहिमेतून मंगळावरील पाण्यातील मूलद्रव्य प्रक्रियेचा उलगडा आपल्या तंत्रज्ञानामुळे झाला. एकूणच स्वयंनिर्मित उपग्रह व खगोल संशोधनामध्ये भारताचे कौशल्य जागतिकस्तरावर सिद्ध झाले आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. शिर्के म्हणाले, विद्यापीठाने सर्वच क्षेत्रांत यशाचा दबदबा निर्माण केला आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांनी यापुढे यशाचा पुढचा टप्पा गाठावा यासाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

यावेळी विद्यापीठाच्या कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेतला. सूत्रसंचालन धैर्यशील यादव व आलोक जत्राटकर यांनी केले. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, डॉ. शिवराम भोजे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता भारती पाटील, पी. डी. राऊत  आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियंका पाटील यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकाने, तर  दीक्षा मोरे यांना कुलपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विश्‍वजित चौगुले, अमृता भंडारे, रणजित चव्हाण, ज्ञानेश्‍वर तराडे, सिद्धेश फोंडके, कुबेर सनकन्‍ना, मयुरी खाडे, रवीना पाटील, मेघा माने, निलोफर जोरा, पूनम रायकर, नीलेश वाळकुंजे, सोनाली पाटील, योगेश्‍वरी वाटवे, हीनाकौसर गवंडी, गीतांजली पवार, हेमा जाधव आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 

tags : Kolhapur,news,Shivaji,University,54th, convocation, ceremony,