Thu, Apr 25, 2019 23:54होमपेज › Kolhapur › विद्यापीठ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सवलतीत ‘नापास’

विद्यापीठ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सवलतीत ‘नापास’

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 8:48PMकोल्हापूर : विजय पाटील 

दिव्यांग विद्यार्थ्यांना कायद्यानुसार हक्काच्या सुविधा आणि सवलतींची अपुरी अंमलबजावणी शिवाजी विद्यापीठाकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची असणारी 3 टक्के अतिरिक्त गुणांची सवलत दिली जात नाही. तसेच पेपरसाठी नियमाप्रमाणे जादा वेळ दिला जात नाही. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठास नापास’ शेरा द्यायला हरकत नाही. 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 2004 साली आणि आता सुधारित 4 मार्च 2017 साली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयी-सवलतींबाबत जी.आर. काढला आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांकडून या जी.आर.ची अंमलबजावणी काटेकोर सुरू आहे. कोणत्याही कायद्याची किंवा नियमाची अंमलबजावणी झाली तर त्याचा लाभ संबंधितांना मिळू शकतो.

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत अपुर्‍या सवलती राबवल्या जात आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जात असल्याचे संकेतस्थळावर म्हटले असले तरी असे काही प्रत्यक्षात नाही. कारण माहिती अधिकारात गजानन घगे यांना दिलेल्या माहितीत तीन टक्के गुणांची सवलत दिली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह पेपरसाठी प्रत्येक तासाला वीस मिनिटे म्हणजे तीन तासांच्या पेपरसाठी संबंधित विद्यार्थ्यांना एक तास जादा वेळ देण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र अर्धा तास जादा वेळ दिला जात आहे. विद्यार्थ्यांचे पेपर वेगळे ठेवून तपासण्याची अंमलबजावणी अद्याप केली गेली नाही. परीक्षा केंद्राच्या बाबतीत असणारे नियमसुद्धा पाळले जात नाहीत.  याबाबत परीक्षा नियंत्रक   महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.