Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू (video)

कोल्हापूर : शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू (video)

Published On: Feb 07 2018 2:33PM | Last Updated: Feb 08 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीवरल ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम तज्ज्ञांच्या पथकामार्फत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आले. ऑडिटसाठी पुलावरील सर्व वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. या पथकाने दिवसभरात मटेरियल तपासणी, प्रोफाईल मॅनेजमेंटचे काम पूर्ण केले. गुरुवारीही पुलावरी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

दरम्यान, पुलाच्या अंतर्गत भागातील मजबुतीच्या तपासणीसाठी गुरुवारी इंडोस्कोपी आणि रडार चाचणी घेण्यात येणार आहे. सुमारे तीन दिवस स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम चालणार असून त्यानंतर दोन ते तीन दिवसांत हे पथक आपला अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागास सादर करणार आहे. या पुलावर प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू केले आहे.

 ध्रूव कन्सल्टन्सीला हे काम देण्यात आले असून, ध्रूव कन्सल्टन्सीने नवी मुंबई येथील स्ट्रकवेल डिझायनर्स या कंपनीस हे काम दिले आहे. स्ट्रकवेल कंपनीचे प्रकल्प संचालक जितेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक बुधवारी सकाळीच पुलावर दाखल झाले. यावेळी मेजर ब्रीज इन्स्पेक्शन युनिट ही अत्याधुनिक सुविधांनियुक्‍त मोबाईल व्हॅन पुलावर दाखल झाली होती. क्रेनसह असणार्‍या या मोबाईल व्हॅनची यंत्रणा रिमोट कंट्रोलवर सुरू होती. या पुलाचे तीन टप्प्यांत ऑडिट केले जाणार आहे. प्रोफाईल मॅनेजमेंट, जीपीआर टेस्ट आणि इंडोस्कोपी (रडार इन्स्पेक्शन)  अशा तीन टप्प्यांत सुक्ष्म पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. 
 सर्वप्रथम क्रेनच्या बकेटमधून कर्मचारी पुलाच्या खांबावर गेले, तेथून लाईन दोरी आणि मेजरमेंट टेपच्या सहाय्याने पुलाची उंची, प्रत्येक कमानीतील अंतर, पुलावरील स्लॅब आणि कमानीचा तळभाग याचे अंतर खांबाचे मोजमाप आदी  मापे घेण्यास सुरुवात केली. पुलास पाच कमानी आहेत. पहिल्या कमानीचे मोजमाप घेऊन पाहिले असता मनुष्यबळाच्या साहाय्याने हे मोजमाप घेणे कठीण बनले. मात्र, दिवसभरात बर्‍याचवेळा मनुष्यबळाद्वारे हे मोजमाप घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शक्य झाले नाही. त्यामुळे या पथकाने टोटल स्टेशन मशीन मागविले आहे.हे मशीन उद्या सकाळीच दाखल होणार आहे. या मशीनच्या सहाय्याने टेलीस्कोपसारख्या यंत्रणेद्वारे पुलाचे चोहोबाजूने एकाच वेळी मोजमाप केले जाणार आहे. त्यानंतर प्रकल्प अधिकारी जितेंद्र भुजबळ स्वत: क्रेनमध्ये बसून पुलाची तपासणी करण्यासाठी गेले. पुलाच्या कमानी, दगड दगडातील दरजा, त्यातील केमिकल या सर्व घटकांची भुजबळ यांनी पाहणी केली.

पुलाच्या सर्व भागात इंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्युत कनेक्शन आवश्यक होते. सुमारे एक तासभर विद्युत कनेक्शनसाठी धावाधाव करण्यात आली. अखेर तेथील एका घरातून विद्युत पुरवठा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संबंधित घरापासून पुलापर्यंत वायर पोहोचली. त्यामुळे जनरेटर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न फसल्याने इंडोस्कोपीचे कामही तीननंतर थांबविण्यात आले. सायंकाळी पाचपर्यंत पुलाचे मटेरियल टेस्टिंग आणि काही प्रमाणात मोजमाप घेण्याचे काम करून या पथकाने संपूर्ण पुलाची चोहोबाजूंनी पाहणी केली. सायंकाळी पाचनंतर ऑडिटचे काम बंद करण्यात आले. हे काम बंद केल्यानंतर तत्काळ म्हणजेच सायंकाळी पाच वाजता पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. स्ट्रकवेल कंपनीचे जितेंद्र भुजबळ, जी. पी. सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, व्ही. जी. गुळवणी, सहायक अभियंता प्रशांत मुंगाटे, संजय ठमके यांच्या खासगी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीयमहामार्ग विभागाचे कर्मचारी, मैलकुली यांची फौज तैनात करण्यात आली होती. 

इंडोस्कोपी म्हणजे पुलावर एक छेद घेऊन त्याद्वारे छोटी सळीसारखे यंत्र सोडण्यात येते. या यंत्रामार्फत पुलाच्या बांधकामात अंतर्गत भागातील क्षमता आणि त्यातील समस्या याची तपासणी केली जाते. तर रडारद्वारे अंतर्गत भागातील मटेरियलची चाचणी केली जाते, असे सूत्रांनी सांगितले. स्ट्रकवेल कंपनीचे जितेंद्र भुजबळ म्हणाले, या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आम्हावर सोपविले आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केली आहे. तीन दिवस हे काम चालणार असून, त्यानंतर पुलाच्या मजबुतीकरणाबाबत अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागास सादर केला जाणार आहे. 

बघ्यांची गर्दी अन् पोलिस बंदोबस्त 

साडेदहा वाजता काम सुरू होताच वाहतूक  बंद करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूने नागरिकांची, पादचार्‍यांची वर्दळ सुरू होती. पुलाच्या पलीकडे आणि अलीकडे ये-जा करणारे नागरिक थांबून ऑडिटचे काम पाहत असल्याने कामात अडथळा निर्माण होत होता. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी बघ्यांची गर्दी हटवून कामातील अडथळा दूर केला.

आपत्ती निवारण आणि मनपा नामानिराळे 

अपघातामुळे चर्चेत आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचे ऑडिट सुरू असताना आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित नव्हते. या यंत्रणेस विद्युत पुरवठा, जनरेटर, वायर आदी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्रणांचा वापर झाला असता, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.