होमपेज › Kolhapur › शिवाजी पूल हलक्या वाहनांसाठी खुला; राजाराम बंधारा बंद

शिवाजी पूल हलक्या वाहनांसाठी खुला; राजाराम बंधारा बंद

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पूल मंगळवारपासून हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. सकाळपासून दुचाकींसह मोटार, रिक्षा वाहतूक सुरू झाली. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांसह पर्यटकांची गैरसोय टळल्याने समाधान व्यक्‍त होत आहे.

गेले तीन दिवस वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांनी सीपीआर चौक, कसबा बावडा, राजाराम बंधारा, वडणगे मार्गे पुढे जावे लागत होते. रत्नागिरीकडे जाणारी मोटार वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने पर्यटकांचे व प्रवाशांचे हाल होत होते. प्रशासनाने दोन दिवस केवळ दुचाकींची वाहतूक सुरू होती. मंगळवारी दुपारपासून मोटारी, रिक्षांसाठी शिवाजी पूल खुला करण्यात आला.

राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद

कसबा बावड्यातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा मंगळवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या बंधार्‍यावरून दोन दिवसांपासून अवजड वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक सुरू होती. कसबा बावड्याहून वडणगे, निगवेमार्गे हायवेवर जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून या बंधार्‍याचा उपयोग केला जातो. शिवाजी पुलावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीच्या कारणास्तव हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक राजाराम बंधार्‍यावरून सुरू होती. राजाराम बंधार्‍याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंधार्‍याच्या दोन्ही बाजूस बॅरेकॅड्स लावण्यात आले आहेत.