होमपेज › Kolhapur › भार क्षमता चाचणीसाठी आज शिवाजी पूल बंद

भार क्षमता चाचणीसाठी आज शिवाजी पूल बंद

Published On: Feb 07 2018 1:56AM | Last Updated: Feb 07 2018 1:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पूल बुधवारी (दि. 7) सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी या पुलाची भार क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

शिवाजी पुलाचा कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघातात तेराजण ठार झाले आहेत. या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर 28 जानेवारी रोजी या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील पाहणीत या पुलावरून दहा टनांपेक्षा जादा भार वाहतूक करू नये, या निष्कर्षावर संबंधित अधिकारी आले आहेत. शिवाजी पुलास 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलास पर्यायी पूल बांधण्यात येत आहे. पर्यायी पुलाचे काम रखडल्याने शिवाजी पुलावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे. नॅशनल हायवे विभागाच्या सूचनेनुसार ध्रुव कन्स्लटन्सी या एजन्सीने रविवारी  मोबाईल व्हॅनसह दहा-बाराजणांच्या पथकाने शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. बुधवारी या पुलाची भार क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी खास यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

या पथकाने केलेल्या मागील पाहणीत कमानीच्या दर्जा निखळल्याचे स्पष्ट झाले आहे. दर्जा निखळल्याने कमानीच्या दगडांना धोका निर्माण झाला आहे. दोन दगडांतील सिमेंट (दरजा) निखळल्याने पूल कमकुवत होत आहे. त्यामुळे या दरजा भरताना सिमेंट-वाळूचा वापर न करता इपॉक्सी ट्रिटमेंटद्वारे या दरजा भरा, अशी सूचना दिली आहे. बुधवारी अत्याधुनिक यंत्रणांसह पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार आहे. प्रामुख्याने कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची विशेष तपासणी केली आहे. या चाचणीतून पूल मजबूत आहे की कमकुवत, हे स्पष्ट होणार आहे.  ध्रुव कन्स्लटन्सीचे प्रोजेक्ट मॅनेजर बी. बी. इखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर अंतिम अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे दिला जाणार आहे. यावेळी नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी या पुलावरील वाहतूक सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तपासणीवेळी संबंधित अधिकार्‍यांना अडचण येऊ नये अथवा पुुलावर अपघात टाळण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूल बंद ठेवावा लागत असून, यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता एस. व्ही. कांडगावे यांनी केले आहे.

शिवाजी पुलावरील वाहतूक आज शिये मार्गे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट बुधवारी सुरू होणार असून शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक शिये मार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनधारकांनी या काळात सीपीआर चौक, कसबा बावडा, शिये मार्गाचा अवलंब करावा.