Wed, Jul 17, 2019 08:42होमपेज › Kolhapur › शिवाजी, बालगोपाल, पीटीएम (ब) संघांची आगेकूच

शिवाजी, बालगोपाल, पीटीएम (ब) संघांची आगेकूच

Published On: May 30 2018 2:13AM | Last Updated: May 30 2018 1:46AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत मंगळवारी शिवाजी तरुण मंडळाने ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळावर 3-0 गोलनी, बालगोपाल तालीमने प्रॅक्टिस क्लब (ब) वर 4-0 गोलनी आणि पाटाकडील तालीम मंडळ (ब) ने उत्तरेश्‍वर तालीम मंडळावर 4-1 गोलनी विजय मिळवून आगेकूच केली. 

स्पर्धेतील पहिली लढत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध ऋणमुक्तेश्‍वर तालीम यांच्यात झाली. सुरुवातीपासूनच शिवाजी मंडळाने आक्रमक खेळीला सुरुवात केली. स्पर्धेच्या 28 व्या मिनिटाला शिवाजीच्या अक्षय सरनाईकने पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. लगेच 38 व्या मिनिटाला सुमित जाधवने संघासाठी दुसर्‍या गोलची नोंद केली. ऋणमुक्तेश्‍वरने अनेक संधी गमावल्या. पहिल्या हाफमध्ये शिवाजीने 2-0 गोलची आघाडी घेतली. दुसर्‍या हाफमध्ये शिवाजीने आक्रमक चढाय्या सुरूच ठेवल्या. 73 व्या मिनिटाला विशाल सासनेने संघासाठी दुसरा गोल नोंदवला. ऋणमुक्तेश्‍वरला शेवटपर्यंत गोलचे खाते उघडता आले नाही. 

दुसरी लढत बालगोपाल विरुद्ध प्रॅक्टिस (ब) यांच्यात झाली. स्पर्धेच्या 4 व्या मिनिटालाच बालगोपालच्या सचिन गायकवाडने खाते उघडले. यानंतर 22 व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने संघासाठी दुसरा गोल नोंदविला. प्रॅक्टिसच्या सुनील कदम, शुभम मस्कर, आकाश मयाने, रजत जाधव, रोहित भोसले यांनी वेगवान चाली केल्या. पण त्याचे रूपांतर गोलमध्ये होऊ शकले नाही. 32 व्या मिनिटाला पुन्हा बालगोपालच्या श्रीधर परबने तिसरा गोल नोंदविला. पहिल्याच हाफमध्ये बालगोपालने 3-0 गोलने आघाडी घेतली. दुसर्‍या हाफमध्ये बालगोपालच्या सचिन गायकवाड, रोहित कुरणे, दिग्विजय वाडेकर, सुमित घाटगे यांनी चढाय्या सुरूच ठेवल्या. 54 व्या मिनिटाला बालगोपालच्या सूरज जाधवने संघासाठी चौथा गोल केला. 

पीटीएम (ब) आणि उत्तरेश्‍वर तालीम मंडळ यांच्यात तिसरी लढत झाली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळीला सुरुवात केली. 33 व्या मिनिटाला पीटीएमच्या अक्षय पायमलने संघासाठी पहिला गोल नोंदविला. दुसर्‍या हाफमध्ये 42 व्या मिनिटाला पीटीएमच्या रोहण कांबळेने दुसरा गोल नोंदविला. यानंतर 64 व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने तिसर्‍या गोलची कमाई केली. उत्तरेश्‍वरकडून आदित्य लाडने 74 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून संघासाठी खाते उघडले. लगेच पीटीएमच्या उत्कर्ष फडतरेने संघासाठी चौथा गोल नोंदविला. 4-1 गोलने पीटीएमने विजय मिळविला.   

आजचे सामने
कोल्हापूर पोलिस विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ,  वेळ : सकाळी 7 वाजता.
फुलेवाडी विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लब, वेळ : दुपारी 2 वाजता.
दिलबहार विरुद्ध प्रॅक्टिस (अ), वेळ : दुपारी 4 वाजता.