Mon, Aug 19, 2019 09:04होमपेज › Kolhapur › ‘जगात भारी  19 फेब्रुवारी...’

‘जगात भारी  19 फेब्रुवारी...’

Published On: Feb 07 2018 2:20AM | Last Updated: Feb 07 2018 1:13AMकोल्हापूर : सागर यादव 

‘जगात भारी  19 फेब्रुवारी...’, ‘शिवराय मना-मनात, घरा-घरांत आणि शिवजयंती घरा-घरांत...’ असे ब्रीद घेऊन सर्वत्र 19 फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या शिवछत्रपती यांच्या जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा सोहळा विविधतेने साजरा करण्यात येणार आहे. 

रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अशा या घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जातो.  ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’, अशी शिस्त शिवछत्रपतींच्या मावळ्यांची होती. हा वारसा जपण्याचे कार्य आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवभक्‍त-इतिहासप्रेमी संस्था-संघटना-तालीम-मंडळांकडून केले जात आहे. 

शिवछत्रपतींनी दूरद‍ृष्टीने लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना, त्यांचे पुरोगामी विचार, शेती विषयक धोरण, संरक्षणाच्या उद्देशाने उभे केलेले गडकोट-किल्ले आणि विकसित केलेले युध्दतंत्र या व अशा इंत्थभूत इतिहासाची माहिती भावी पिढीला व्हावी या उद्देशाने  विविध उपक्रम राबविले जात आहेत. इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवशाहिरांचे पोवाडे, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा अशा कार्यक्रमांनी शिवजयंती सोहळा साजरा केला जातो. 

राज्य शासनातर्फे जन्मस्थळी सोहळा...

 शासनाच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला जातो. 

शिवछत्रपतींच्या मार्गदर्शक राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासह बालशिवाजींच्या पुतळ्याचे पूजन करून आणि पाळणा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, इतिहास संशोधकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शिवभक्‍त-इतिहासप्रेमी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. शिवनेरीबरोबरच शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, मुख्य राजधानी रायगड, स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार रायरेश्‍वर, दक्षिणेचा भक्‍कम किल्ला पन्हाळा, शिवप्रतापाचा साक्षीदार प्रतापगड, सिंधूबंदी कायदा मोडून निर्माण केलेली ‘शिवलंका’ सिंधुदुर्ग या मुख्य गडकोटांसह सह्याद्री पर्वत रांगेतील दुर्गम गड ,  किल्ल्यांवर शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

राजधानी दिल्‍लीत शिवजयंती...

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेनुसार यंदा प्रथमच देशाची राजधानी दिल्ली येथे कोल्हापूरकरांच्या पुढाकाराने शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. आपल्या राजाची जयंती दिमाखात  साजरी व्हावी यासाठी देशभरातील विविध राज्यात वसलेल्या मराठी बांधवांकडून जय्यत तयारी सुरू आहे. सोमवार दि. 19 ते बुधवार दि. 20 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा असा मानस आहे.