Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Kolhapur › शिवसेनेची तटस्थता काँग्रेसच्या पथ्यावर

शिवसेनेची तटस्थता काँग्रेसच्या पथ्यावर

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 25 2018 11:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 44 नगरसेवक आहेत. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे 33 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे शिवसेनेचे चार व पिरजादे आणि चव्हाण यांना घेऊन महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यासाठी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे प्रयत्न होते. त्यासाठी राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पाडले जाणार होते. परंतु, शिवसेनेने महापौर-उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजप-ताराराणी आघाडीच्या रणनीतीवर पाणी फिरले. निवडणुकीला कलाटणी देणारा निर्णय शिवसेनेने घेतल्याने काँग्रेसचा विजय सोपा झाला. 

उपमहापौरपद निवडणुकीत शिवसेनेला झीरो...

महापौर -उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापौरपदाच्या निवडणुकीतून उत्तुरे यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले चव्हाण हे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी पीठासन अधिकार्‍यांच्या नावे पत्र देऊन माघारीसाठी उत्तुरे यांना मी सर्वाधिकार देत असल्याचे कळविले होते. परंतु, पीठासन अधिकारी खेमनार यांनी विहीत नमुन्यातील माघारीचा अर्ज नसल्याने उत्तुरे यांची मागणी अमान्य केली. परिणामी, त्यांचा अर्ज उपमहापौर निवडणुकीत तसाच राहिला. त्यांच्यासाठी मतदान घेतल्यावर शिवसेनेच्या चव्हाण यांना झीरो मते पडली. त्याविषयी दिवसभर महापालिकेत उलट-सुटल चर्चा सुरू होती. 

सतेज पाटील बनले ‘सारथी’...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक 20 मेपासून गोव्यात होते. गुरूवारी रात्री ते बेळगांवात थांबले. तेथून सकाळी कोल्हापूरात लक्झरी बसमधून आले. गेले तीन दिवस गोव्यातून बेळगाव व कोल्हापूरपर्यंत आमदार सतेज पाटील व प्रतिमा पाटील या नगरसेवकांसमवेत होते. कोल्हापूरात आल्यावर अजिंक्यतारा येथून सकाळी सव्वादहाला ते बाहेर पडले. यावेळी महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या बोंद्रे या आ. पाटील यांच्या गाडीत होत्या. पाटील यांनी स्वतः गाडी चालवत बोंद्रे यांना महापालिकेत आणले. त्यामुळे ‘सतेज पाटील बनले सारथी’अशी चर्चा महापालिकेत सुरू होती. त्यांच्यासोबत ऋतुराज पाटील होते. ओळखपत्र पाहून फक्त नगरसेवकांना महापालिकेत सोडले जात होते. त्यामुळे सतेज पाटील व ऋतुराज पाटील हे नगरसेवकांना सोडून तेथेच पाच मिनिटे मुख्य गेटजवळ थांबले. निवडणूक  प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ते निघून गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर होते.  

बोंद्रे, सावंत यांच्या जल्लोषी मिरवणूका...

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात प्रचंड ईर्षा आहे. परिणामी निवडणूकही अत्यंत चुरशीची बनली होती. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने सर्वोतोपरी खबरदारी घेतली होती. महापालिका सभागृहाबाहेर आणि इमारतीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.  

लॉटरी विक्रेता ते उपमहपौर...

उपमहापौरपदी निवड झालेले महेश सावंत यांचे वडील पीडब्ल्यूडीमध्ये चालक होते. गंजीमाळ येथे राहणार्या सावंत कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखिची होती. सावंत यांनी शहरात ठिकठिकाणी लॉटरी, कॅलेंडर विकून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी फार्माचे शिक्षण घेऊन ते औषध व्यावसायिक बनले. यापूर्वी त्यांनी महापालिकेच स्थायी समिती सभापतीपद भूषविले होते. 

...म्हणूनच तटस्थ - शिवसेना नगरसेवक

गेल्या काही दिवसांत शिवसेना नगरसेवक फुटले. महापौरपदाच्या निवडणूकीत घोडेबाजार अशा अफवा पसरवून शिवसेनेविषयी संभ्रमावस्था निर्माण करून बदनामीचा प्रयत्न केला जात होता. परंतू आम्ही स्वाभिमानाने निवडणूकीला सामोरे गेलो असून घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठीच तटस्थ राहण्याची भुमिका घेतली, असे शिवसेनेचे परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, गटनेता नियाज खान, नगरसेवक सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांनीही मातोश्रीच्या आदेशानेच नगरसेवक तटस्थ राहीले, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.