Thu, Aug 22, 2019 12:52होमपेज › Kolhapur › शरद पवारांनी काँग्रेसची भांडी घासली

शरद पवारांनी काँग्रेसची भांडी घासली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जयसिंगपूर/कुरूंदवाड : प्रतिनिधी

शरद पवार काल बोलले, पटत नसेल, नांदता येत नसेल तर वेगळे व्हा. या पवारांनी दहा-पंधरा वर्षे पटत नसताना, सोनियांनी हाकलून काढले असताना काँग्रेसची भांडी घासली, ते आम्हाला शिकवतात. सोनियांनी हाकलून दिले तरी त्यांच्याबरोबर जाऊन सत्ता भोगली. आम्ही बाहेर पडलो, तर हे आतमध्ये घुसणार. तयारच आहेत. हे मी बोलत नाही, भाजपचे खा. नाना पटोलेच बोललेले आहेत. भाजपचे सरकार शिवसेनेवर चालत नाही, तर राष्ट्रवादीच्या अद‍ृश्य हातांचा त्यांना पाठिंबा आहे. ही अशी थेरं आणि नाटकं मला चालत नाहीत, अशी घणाघाती टीका शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कुरूंदवाड येथे एसपी हायस्कूलच्या क्रीडांगणावर दुपारी शिवसेना शेतकरी संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत ठाकरे बोलत होते. 

यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नोटाबंदी, जीएसटी आणि सरकारच्या जाहिरातीवर झोड उठविली. ते म्हणाले, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला नाही, उलट वाढला. काश्मीर शांत झाला नाही उलट दहशतवाद वाढला, याचा हिशेब सरकारने आधी द्यावा.

छत्रपतींच्या नावे शेतकर्‍यांची फसवणूक सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकर्‍यांची फसवणूक  छत्रपतींच्या नावाने होत असेल, तर ते सहन करणार नाही. त्यांना आम्ही जागा दाखवू. केवळ ‘मन की बात’ सांगू नका. शेतकरी, व्यापार्‍यांनाही मन आहे. ती ‘मन की बात’ एकवटली, तर तो प्रचंड आणि बुलंद आवाज होईल याची जाण सरकारने ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, नोटा बंदीमुळे 15 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या, सगळा भूलभुलैया सुरू आहे. जाहिरातीला भुलू नका, तुमच्या अनुभवाला जागा, माझ्यासारखे उघडपणे बोला, असे आवाहन करून ते म्हणाले, हे करू शकणार असाल तर रस्त्यावर उतरा. नुसते कण्हत आणि कुढत बसू नका. जसे गुजरातचा व्यापारी रस्त्यावर उतरला, तसे  महाराष्ट्रातला शेतकरी व व्यापारी रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही.

केवळ गुजरात निवडणुकीसाठी जीएसटी कमी करण्यात आला. गुजरातचा व्यापारी रस्त्यावर उतरला. त्याला घाबरून जीएसटी कमी करण्यात आला. एकही भूल, कमळ का फूल अशी टीका व्यापार्‍यांनी केली. त्यावेळी जीएसटी कमी झाला, असे सांगून ते म्हणाले, माझे शेतकरी मावळे आहेत. गुजरातचे व्यापारी रस्त्यावर उतरत असतील, तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला, तर तुमचे सरकार टिकणार नाही.

पंतप्रधान  मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मित्रहो मला मते द्या, मी तुम्हाला 15-15 लाख रुपये देतो. साधी दीड लाखाची कर्जमाफी झाली नाही आणि 15 लाखांच्या थापा मारतात. मुख्यमंत्री सांगतात साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. कुणाच्या खात्यावर कर्जमाफी झाली, ते सांगा. शेतकर्‍यांची खाती स्विस बँकेत आहेत का, ते तरी सांगा. केवळ चार हजार शेतकर्‍यांना तुटकी-फुटकी कर्जमाफी मिळाली, तीही ऑनलाईनसाठी हेलपाटे मारून मिळाली. 13 लाख शेतकर्‍यांची खाती गायब झाली आहेत. ती कशी झाली, याचा जाब विचारला जाईल.

आ. उल्हास पाटील म्हणाले, तालुक्यात 18 हजार हेक्टर जमीन क्षारपड आहे. शासनाने या प्रश्‍नाकडे गंभीरतेने पहावे. पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वारणेचे पाणी प्रदूषित होत आहे. पंचगंगेवर शिरोळ-कुरूंदवाड हा पूल झाला, तर निम्मी वाहतूक सोपी होणार आहे.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.  कुरूंदवाड शहर शिवसेना, सैनिक टाकळी येथील सैनिक व कुरूंदवाड मुस्लिम सुन्‍नत जमातीच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. खा. गजानन कीर्तीकर, खा. विनायक राऊत, दादासाहेब भुसे, ना. दीपक केसरकर, अरुण दुधवडकर, ना. विजय शिवतारे, दगडू संकपाळ यांच्यासह आमदार सर्वश्री सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख सतीश मलमे, जयसिंगपूरचे नगरसेवक पराग पाटील, उपप्रमुख मधुकर पाटील, युवासेना अध्यक्ष वैभव उगळे, राजू आवळे उपस्थित होते. विकास पाटील, माणिक जगदाळे, संतोष जाधव, अण्णासाहेब बिलोरे, मंगल चव्हाण, सतीश मलमे, पै. नंदू सुतार, मधुकर पाटील यांचीही भाषणे झाली.