Wed, Mar 20, 2019 03:13होमपेज › Kolhapur › शिवजयंती ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा

शिवजयंती ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:58AMबरेली : पार्थ कपोले

राजधानी दिल्लीत खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे.  यानिमित्त उत्तर भारतात वसलेल्या मराठी समाजाला एकत्र आणण्याची खा. संभाजीराजे यांची कल्पना आहे. गुरुवारी त्यांनी उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील मराठी समाजाची भेट घेऊन त्यांना शिवजयंती सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. 

खा. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उत्तर प्रदेशातही प्रेम व आदराने घेतले जाते, हे पाहून आनंद वाटला.  शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत. ते अखिल भारताचे आहेत. शिवजयंती हा ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत. आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या या पैलूंचा अभ्यास होणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेशात राहूनही मराठी संस्कृती तुम्ही जपून ठेवली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. बरेली शहरातील एका सभागृहात मराठी कुटुंबांचे एकत्रीकरण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.

बरेलीतील उत्साहाचे वातावरण
बरेली शहर व आसपासच्या गावांमध्ये सुमारे 300-350 मराठी कुटुंबे राहतात. दिल्लीत होणार्‍या या सोहळ्याबद्दल त्यांच्या उत्साह आहे. छत्रपतींचे वारसदार स्वतः निमंत्रण घेऊन आल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. बरेलीतून सुमारे 1 हजार लोक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

शिवजयंती सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
दिल्लीत होणार्‍या शिवजयंती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद  प्रमुख पाहुणे असणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या पटांगणावर सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या कार्यक्रमास लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौदलप्रमुख एडमिरल सुनील लांबा, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फंट्री पी.जे.एस.पन्नू आणि शाहू  महाराज यांची  उपस्थिती राहणार असल्याचे  खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

आमच्यासाठी अभिमानास्पद प्रसंग 
दिल्लीत होणारा शिवजयंती उत्सव आणि त्याचे निमंत्रण घेऊन स्वतः संभाजीराजे बरेलीमध्ये आले, हा आमच्यासाठी अभिमानास्पद प्रसंग असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. मूळचे  सांगलीचे असलेले पाटील 1961 पासून बरेलीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा सराफी व्यवसाय  आहे. त्यांनी बरेली आणि आसपासच्या भागात गणेशोत्सवाची सुरुवात केली असून, आज या भागात 270 गणेशमंडळे आहेत. सोबतच शिवजयंतीदेखील मोठ्या उत्साहात ते साजरी करतात.