होमपेज › Kolhapur › शिरोलीत निर्बिजीकरणानंतरही कुत्र्यांची समस्या कायम

शिरोलीत निर्बिजीकरणानंतरही कुत्र्यांची समस्या कायम

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:53PM

बुकमार्क करा
शिरोली पुलाची : वार्ताहर

शिरोलीमध्ये निर्बिजीकरण करून सुद्धा भटक्या कुत्र्यांच्या  संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. गावच्या लोकसंख्येचा विचार करता गावात हजारांवर भटकी कुत्री आहेत. गावात भरवस्तीत केंद्रस्थानी असलेल्या मटण मार्केट असून या मार्केटमधील मांसावर कुत्र्यांची संख्या वाढत आहे. शिरोली ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्य शासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायदा 2011 पारित केला आहे. या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अनिवार्य आहे. त्यातून दोन वर्षांपूर्वी शिरोली ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय आरोग्य केंद्राकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरणाची प्रक्रिया राबविली होती. त्यातून 50 वर कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र ही निर्बिजीकरण मोहीम थंडावली आहे. 

सध्या काही मटण, चिकन विक्रेत्यांकडून वेस्टेज मटण मार्केटच्या पिछाडीस असणार्‍या मोकळ्या तळीमध्ये टाकण्यात येते.  हे मांस खाण्यासाठी कुत्र्यांचे कळत तयार झाले आहे. ही कुत्री दुचाकी-चारचाकी वाहनांचा पाठलाग करीत असतात. यावेळी अपघाताची  शक्यता  आहे.  याबाबत शिरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश यादव व ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण व निर्बिजीकरणासाठी साधारणत: एका कुत्र्यासाठी 1 हजार रुपये खर्च येत आहे. त्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायत फंडातून खर्च केला आहे. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची गरज असल्याची  सांगितले.