होमपेज › Kolhapur › शिरोली तलावाचा श्‍वास गुदमरतोय

शिरोली तलावाचा श्‍वास गुदमरतोय

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:48PM

बुकमार्क करा
शिरोली पुलाची : राजू पाटील 

 येथील गावतलावाला जलपर्णीबरोबरच भोवतालच्या उकिरड्यांनी श्‍वास गुदमरत आहे. ग्रामस्थांचे वक्रदृष्टी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या तलावाला ग्रहण लागले आहे. या गावतलावासाठी 3 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, तो लालफितीत अडकला आहे. या गावतलावाला ऊजिर्र्तावस्था आणून रंकाळाच्या धर्तीवर या तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

पूर्वी शिरोलीला या गावतलावातून पाणीपुरवठा होत होता. परंतु, टोप सह 11 गावांना नळपाणीपुरवठा योेेजनेतून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यापासून या गावतलावातील पाणी उपसा बंद झाला. परंतु, गावचा पाणीपुरवठा उपसा बंद झाला असला तरी या तलावातून कमळ फुले, मासेमारी, मुळ्या काढणे यासाठी दर तीन वर्षांनी या तलावाचा लिलाव 5 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून देतो. त्यातून तलावासाठी किरकोळ खर्च केला जातो. सध्या या गावतलावाचे रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत. तलावाच्या काठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बाके ठेवण्यात आली आहेत.
परंतु, काही विघ्नसंतोषी लोकांनी या बाकांचे बाजूच्या फरशा, पेव्हिंग ब्लॉक चोरून नेल्या आहेत.

सध्या तलावाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने नेऊ नयेत, यासाठी लोखंडी खांब बसविले आहेत. परंतु, हे लोखंडी खांबही लंपास केले आहेत. त्यामुळे पादचार्‍या व्यतिरीक्त काही वाहनचालक या रस्त्यावरून दुचाकी वाहने नेतात. त्यामुळे पेव्हिंग ब्लॉक फुटून रस्स्याला अवकळा प्राप्त झाली आहे. याशिवाय काही ग्रामस्थांनी शेणखते, उकिरडे या रस्त्यालगत टाकले आहेत. त्याच्यावर कायमस्वरुपी कारवाईची गरज आहे.

 याबाबत उपसरपंच सुरेश यादव, ग्रा.पं. सदस्य बाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तलावाचे संवर्धन व सुशोभिकरणासाठी 3 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पर्यावरण विभागाने यास मंजुरी दिली आहे. परंतु, वित्त विभागाकडे ही मंजुरी लालफितीत अडकली आहे.  जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार संत गाडगेबाबा रथ पूजनप्रसंगी निधी मंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.