Thu, Apr 25, 2019 03:57होमपेज › Kolhapur › पोलिसांच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणाची आत्महत्या?

पोलिसांच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणाची आत्महत्या?

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 06 2017 2:01AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

अ‍ॅट्रॉॅसिटीचा गुन्हा दाखल करणार व महिलेबरोबरचे फोनवरील अश्‍लील संभाषण पोलिसांना देणार, अशी फोनवरून वारंवार धमकी देऊन  व पैसे उकळून ब्लॅकमेल केले जात होते. या कारणातून राजाराम महादेव माने (वय 36, रा. शिरोळ) याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या घटनेला घालवाड येथील पोलिसांचे दोन खबरे व शिरोळ पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत. संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मंगळवारी शिरोळमधील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

पोलिस कर्मचार्‍यास ताब्यात द्या, अशी भूमिका घेत जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढविला. संतप्त जमावामुळे पोलिस कर्मचार्‍यांनी डायरी अंमलदारास मागील दाराने पळवून लावून जमाव पांगविण्यासाठी राखीव दलाला पाचारण केले. तो कर्मचारी पळून गेल्याने  जमावाने पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी, संबंधित कर्मचारी तुमच्यावर जातीवाचक गुन्हाही दाखल करू शकतो, अशी समज दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मृत राजाराम यांच्या मृत्यूस निखिल खाडे, शशिकांत साळुंखे व एक अनोळखी महिला कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखला झाला आहे.