Wed, Mar 20, 2019 13:06होमपेज › Kolhapur › माने आत्महत्या प्रकरण; तपास अंतिम टप्प्यात

माने आत्महत्या प्रकरण; तपास अंतिम टप्प्यात

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:19PM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. वाळूच्या ट्रकमधून चोरी करण्यात आलेला मोबाईल कागल तालुक्यातील सिद्धराम पाटील नामकास देऊन त्यातील सिमकार्ड स्वतः वापरत होतो, असा कबुली जबाब मास्टरमाईंड निखिल खाडे याने दिला आहे. सोमवारी 18 रोजी खाडे यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला विश्रामबाग (सांगली) किंवा  शाहूपुरी (कोल्हापूर) पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी कुमार कदम यांनी दिली. 

मृत माने प्रकरणात संशयित आरोपी निलंबित पो.कॉ. भुजिंगा कांबळे, शशिकांत साळुखे व स्वाती माने यांना दि. 16 रोजी जयसिंगपूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपी निखिल खाडे याच्यावर उपचार सुरू असल्याने तपास पूर्ण झाला नाही म्हणून पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने खाडे याच्या पोलिस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ केली होती. तपासादरम्यान चोरी केलेला मोबाईल कुठे आहे, या चौकशीत हा चोरीचा मोबाईल कागल तालुक्यातील पाटील यास दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पाटील यास संपर्क करून सोमवारी जबाबास हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संशयित निखिल खाडे याने कागल तालुक्यातील मेतके येथील पाच युवकांची पोलिस भरती करतो असा बनाव करून 10.65 लाखांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणि याच पद्धतीने वाळवा तालुक्यातील चांदोली वडगाव येथील युवतीची 75 हजार रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचा गुन्हा विश्रामबाग (सांगली) पोलिस ठाण्यात दाखल झाला  आहे.