Sat, Nov 17, 2018 01:36होमपेज › Kolhapur › शिरोळ नगरपरिषद ‘क’ वर्गातील

शिरोळ नगरपरिषद ‘क’ वर्गातील

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:39AMशिरोळ : प्रतिनिधी

शिरोळला मंजूर झालेली नगरपरिषद ही ‘ब’ श्रेणी नसून ‘क’ श्रेणीतील आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत श्रेणीसंदर्भात उल्लेख केलेला नाही. तसेच नव्याने जाहीर केलेल्या आकृतिबंध प्रकारानुसार लोकसंख्यानिहाय नगरपरिषद ‘क’ श्रेणीतील राहण्याची शक्यता आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही 27 हजार आहे. नगरपरिषद स्थापनेनंतर लोकसंख्यानिहाय सदस्य संख्येचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच प्रभागरचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीची अधिसूचना विचारात घेतली, तर तीन ते चार बहुसदस्यीय प्रभागरचना होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला तहसीलदार तथा शिरोळनगर परिषद प्रशासक गजानन गुरव यांनी दुजोरा दिला. 6 फेब्रुवारी रोजी शिरोळला नगरपालिका मंजूर झाली.  त्यावेळी ‘ब’ श्रेणी नगरपरिषद मंजूर झाल्याचा  गाजावाजा झाला; परंतु अधिसूचना जाहीर होताना नमुना ‘ब’चा उल्लेख श्रेणी ‘ब’ असा करून घेण्यात आला. त्यानुसारच नगरपरिषदेचे पुढील कामकाज सुरू करण्यात आले. प्रशासक  गुरव यांनी नगरपालिका सदस्य संख्या प्रस्ताव दाखल करताना ही बाब प्रकर्षाने पुढे आली. शिरोळला  ‘क’ श्रेणीची आहे, असे सांगण्यात आल्यानंतर पुढील कार्यभाग  करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या सुधारित आकृतिबंध प्रकार अधिसूचनेनुसार लोकसंख्यानिहाय राज्यात विभागवार ‘अ’ श्रेणीच्या 17 (महानगरपालिका, नगरपालिका), ‘ब’ श्रेणीच्या 73 (नगरपरिषदा), ‘क’ श्रेणीच्या 148 (नगरपरिषदा) आणि नव्याने स्थापन झालेल्या 121 नगरपंचायतींची नोंद आहे. या यादीमध्ये शिरोळ नगरपरिषद वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, वडगाव, जयसिंगपूर, कुरूंदवाड, गडहिंग्लज, पन्हाळा, लुरगूड, मलकापूर, हुपरी, कागल यांचा समावेश आहे. अधिसूचना 12 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली आहे; मात्र आकृतिबंध प्रकारात शिरोळचा उल्लेख नाही. केवळ नव्याने नगरपरिषद म्हणून घोषणा केलेल्या यादीत नाव आहे.

 शिवाय, नगरपरिषदेची श्रेणी कोणती याचा संदर्भ नाही. शासनाच्या सुधारित आदेशानुसार ज्या नगरपरिषदेची लोकसंख्या चाळीस हजारांपेक्षा कमी आहे, अशा गावांतील नगरपरिषदेला ‘क’ श्रेणी देण्यात आली आहे. त्यानुसार सन 2011 च्या जनगणनेनुसार शिरोळची लोकसंख्या सुमारे 27  हजार असल्याने शिरोळ नगरपरिषदेला ‘क’ श्रेणी देण्यात आली आहे. याबाबत गुरव म्हणाले,  शिरोळची नगरपरिषद ही ‘क’ श्रेणीमधील आहे. लोकसंख्यानिहाय सदस्य संख्येचा प्रस्ताव दिला आहे. प्रभागनिहाय 17 सदस्य आणि नगराध्यक्ष असा उल्लेख आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर पुढील कार्यवाही होईल. नियमित काकाजाबरोबर कर वसुलीवर अधिक भर दिला जाईल. जास्तीत जास्त कर वसुलीचे आदेश आहेत. त्यानुसार कामकाज करण्यात येत आहे.