Mon, Apr 22, 2019 21:41होमपेज › Kolhapur › शिरोळ बंदला प्रतिसाद

शिरोळ बंदला प्रतिसाद

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 10:54PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

अमृत योजनेच्या कामाला दानोळीतील ग्रामस्थांनी वारणा बचाव कृती समितीच्या झेंड्याखाली विरोध केला. मात्र, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिरोळ तालुक्यात बंद पाळण्यात आला.

दानोळीसह जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे आवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. जयसिंगपूर येथे गावचावडीसमोर निदर्शने करण्यात आली. घोषणा देऊन पालिका चौक दणाणून सोडण्यात आला. दानोळी व वारणाकाठावरील गावांना पाठिंबा आणि योजनेला विरोध म्हणून बंदची सर्वपक्षीय हाक देण्यात आली होती.जयसिंगपूर शहर व उपनगरांतील व्यवहार सकाळी बंद होते. नगरपालिकेत रत्नाप्पा कुंभार सभागृहात निषेध सभा झाली. यावेळी आ. उल्हास पाटील म्हणाले, योजनेला विरोध करणे काळाची गरज आहे. वारणा बचावच्या पदाधिकार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. जबरदस्तीने योजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गट-तट न पाहता तो प्रयत्न हाणून पाडावा, यासाठी सर्वपक्षीय एकत्र येणे गरजेचे आहे.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, रावसाहेब भिलवडे, दादा पाटील-चिंचवाडकर, कॉ. रघुनाथ देशिंगे, संभाजीराव नाईक, प्रकाश झेले, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, शैलेश आडके यांनी मनोगत व्यक्त केले. 
दिवसभर दानोळीसह परिसरातील कोथळी, उमळवाड, कवठेसार, निमशिरगाव, चिपरी, जैनापूर आदी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. 

इचलकरंजीमुळे पंचगंगा प्रदूषित

शिरोळ : प्रतिनिधी  

बंदला शिरोळ व परिसरातील गावांनी कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. दानोळीकरांच्या आणि वारणा बचाव कृती समितीने घेतलेल्या भूमिकेला वारणाकाठच्या गावांनीही पाठिंबा दिला आहे. गावे बंद ठेवून शासनाचा निषेधही नोंदविण्यात आला.


वारणाकाठप्रमाणे शिरोळ पंचगंगा नदीकाठावर एकंदरीत पंधरा गावे वसली आहेत, तसेच या नदीतून जवळपास 32 गावांना पिण्यासाठी व शेतीकरिता पाणीपुरवठा होतो. सध्या पंचगंगा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. यात इचलकरंजी शहर व नगरपालिकेचा, तसेच शेजारी स्थापन झालेल्या औद्योगिक वसाहतीचा मोठा सहभाग आहे. यासाठी पंचगंगा दूषित करणार्‍या घटकांबरोबरच पाटबंधारे विभागाला  जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शिरोळकरांनी दानोळीकरांना पाठिंबा व गाव बंदनिमित्ताने केली आहे.

निषेध सभा

कुरूंदवाड : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्याची वरदायिनी असणार्‍या पंचगंगा नदीत मोठ्या शहरांनी सांडपाणी व प्रोसेसचे रसायनयुक्त पाणी थेट सोडल्याने शिरोळ तालुक्याला या घाण पाण्याचा सामना करावा लागत आहे. तर दानोळी गावच्या ग्रामस्थांनी वारणेचे पाणी नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून गावाला वेठीला धरणार्‍या प्रशासनाने पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कारवाई करावी; अन्यथा कुरूंदवाडातून कृष्णा नदीतून इचलकरंजीला होणारा पाणीपुरवठा बंद करून पाणीपुरवठा केंद्राला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ. उल्हास पाटील यांनी याप्रसंगी आयोजित सभेत दिला. नगराध्यक्ष जयराम पाटील, बाबासाहेब सावगावे, संजय खोत, दीपक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सन्मित्र चौकमार्गे नवबाग रोड, जुने बसस्थानक, दर्गा चौकातून नगरपालिका चौकात या निषेध रॅलीचे सभेत रूपांतर झाले. दरम्यान, व्यापार्‍यांनी या बंद आंदोलनाला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी दीपक गायकवाड, चंद्रकांत जोंग, रामभाऊ मोहिते, धोंडिबा माळी यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.