होमपेज › Kolhapur › शिंगणापूरचा तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात

शिंगणापूरचा तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 30 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सात-बाराच्या उतार्‍यावर मालकी हक्‍काची नोंद करण्यासाठी सराफ व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची मागणी करणार्‍या शिंगणापूर (ता. करवीर) येथील तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय 42, रा. रचनाकार हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी जेरबंद केले.

कुलकर्णीविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 25 एप्रिल 2018 रोजी तलाठ्याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित रक्‍कम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येण्यास तक्रारदाराला सांगितले होते.

पंचांसमक्ष कृत्याची पडताळणी झाल्यानंतर तलाठ्याने रोख रकमेची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाले होते. त्याआधारे कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले.
अरुण चोडणकर (रा. मंगळवार पेठ) यांनी आई सुनंदा चोडणकर यांच्या नावे 18 जानेवारी 2013 रोजी शिंगणापूर येथील गट नं 79/1 मधील 2300 चौरस मीटर जागा खरेदी केली. व्यावसायिक व्यापामुळे त्याची सात-बारा उतार्‍यावर नोंद करणे राहून गेले होते.

कालांतराने चोडणकर यांनी कुलकर्णीशी संपर्क साधला. सात-बारा उतार्‍यावरील नोंदीसाठी  लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता केली. तलाठ्याने सहा महिने काम प्रलंबित ठेवले. चोडणकर यांनी सतत तगादा लावल्यानंतर मात्र त्याने उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

कारवाईची चाहूल

24 एप्रिल 2018 रोजी तक्रारदाराने तलाठ्याशी पुन्हा संपर्क साधला. संबंधित रक्‍कम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. या काळात चोडणकर यांनी ‘एसीबी’च्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून तलाठ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पथकाने 25 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. मात्र, कारवाईची चाहूल लागल्यावर तो दिवसभर तिकडे फिरकलाच नाही.