होमपेज › Kolhapur › शिंगणापूर बंधार्‍याचे पाणी दूषित

शिंगणापूर बंधार्‍याचे पाणी दूषित

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 12:54AMखुपिरे : वार्ताहर 

कोल्हापूर शहराबरोबरच शिंगणापूर गावास पाणीपुरवठा करणार्‍या शिंगणापूर बंधार्‍यातील पाणी दूषित झाले आहे. तेलकट, मळीमिश्रित पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  तरी कोल्हापूर नगरपालिका प्रशासनाने तत्काळ बंधार्‍याचे बरगे काढून दूषित पाणी सोडून द्यावे आणि बंधार्‍याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
नुकतीच शिंगणापूर विशालतीर्थ यात्रा झाली असून, यात्रेतील दिवे, फुले, फळे, तसेच प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक द्रोण, निर्माल्य बंधार्‍याजवळ साचले आहे. पाण्यावर मळीमिश्रित तवंग पाहायला मिळत आहे.  सध्या प्रयाग चिखली येथील श्री प्रयाग क्षेत्र येथे महापर्वकाळ सुरू असल्याने हजारो भाविक स्नान करण्याकरिता येतात.  यावेळी त्यांच्याकडून फुले, फळे, नारळ आणि निर्माल्य पाण्यात सोडले जाते. त्याचबरोबर काही लोकांकडून नदीपात्रात   कपडे व जनावरेही धुतली जातात. यामुळेही पाणी प्रदूषणात भरच पडत  आहे. 

विशालतीर्थ यात्रा, प्रयाग पर्वकाळ सुरू असेपर्यंत शिंगणापूर बंधार्‍याचे बरगे काढले जावेत, अशी मागणी होत आहे. बंधार्‍यातील दूषित पाण्याबाबत वेळीच उपाययोजना केली नाही, तर कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे  आजार फैलावण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यातून हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.