Tue, Jul 23, 2019 11:36होमपेज › Kolhapur › ‘महिला-बालकल्याण’ सभापती शिंदे यांचा राजीनामा 

‘महिला-बालकल्याण’ सभापती शिंदे यांचा राजीनामा 

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. शुभांगी शिंदे यांनी अखेर बुधवारी  सभापतिपदाचा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्याकडे दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा दिला. हा राजीनामा अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येईल. त्यानंतर नवीन निवडीची प्रक्रिया सुरू होईल. महिला-बालकल्याण समिती सभापतिपदी वंदना मगदूम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून अन्य पदाधिकार्‍यांपेक्षा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. शिंदे यांच्या राजीनाम्याचीच चर्चा अधिक झाली. पदांचे वाटप करत असताना समाजकल्याण समिती व बांधकाम समिती ही जनसुराज्य शक्ती, तसेच उपाध्यक्ष व शिक्षण समिती ही शिवसेना या एकाच पक्षाला देण्यात आली. त्यामुळे सध्याच्या पदाधिकारी बदलाची चर्चा ज्यावेळी होईल त्यावेळी त्यांना बदलायचे की तसेच ठेवायचे, हे त्या पक्षातील नेते, कार्यकर्ते ठरवू शकतात. मात्र, महिला व बालकल्याण समितीबाबत तसे घडले नाही. कारण, महिला व बालकल्याण समिती सभापतिपद मात्र दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले.  त्यामुळे पदाधिकारी निवडताना पहिली संधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. पुढच्या सव्वा वर्षासाठी आवाडे गटाला संधी देण्याचे ठरले होते. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या हातात काही राहिले नव्हते. मुदत संपल्यानंतर सौ. शिंदे यांच्या राजीनाम्यासाठी इच्छुकांनी आग्रह धरण्यास सुरुवात केली. त्यासंदर्भात तीन-चारवेळा बैठका झाल्या. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी इच्छुक असलेल्या गटाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. राजीनाम्यासाठी तेदेखील सकारात्मक होते. सौ. शिंदे यादेखील राजीनामा देण्यास तयार होत्या. तरीदेखील राजीनामा देण्यास सौ. शिंदे यांना मुहूर्त मिळत नव्हता. राजीनामा देता, देता त्या एक-दोनवेळा निघून गेल्या. अखेर आज दुपारी त्यांनी आपला राजीनामा अध्यक्षा सौ. महाडिक यांच्याकडे दिला. यावेळी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, जिल्हा परिषद सदस्य राहुल यादव, प्रवीण यादव, रामचंद्र शिंदे, राजू मगदूम, स्वस्तिक पाटील, राजेश पाटील, गोगा बाणदार आदी उपस्थित होते. 

तत्पूर्वी, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या दालनात स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांची सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अन्य पदाधिकारी राजीनामे कधी देणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.