Sat, Apr 20, 2019 18:46होमपेज › Kolhapur › स्त्रियांना सन्मान दिल्यास आदर्श समाजाची निर्मिती 

स्त्रियांना सन्मान दिल्यास आदर्श समाजाची निर्मिती 

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:10PMवाघवे/कोल्हापूर : प्रतिनिधी 

घरातील स्त्री आत्मविश्‍वासाने उभी राहिल्यास तिच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्‍वास ठेवल्यास भावी पिढीसह आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. गोलीवडे (ता. पन्हाळा) येथे आजोळी सत्कार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी ‘मामाच्या मुलीशी लग्न करायचे राहून गेले’, अशी मिश्कील टिप्पणी करताच उपस्थितांत  हशा पिकला.

सद्गुरू योगीनाथ महाराज फौंडेशन गोलिवडे यांच्यातर्फे गावकर्‍यांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. भैरवनाथाचे पुजारी पांडुरंग गुरव, सरपंच नंदाताई चेचर यांच्या हस्ते पवार यांचा भारतीय संविधान, भैरवनाथाची मूर्ती, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे या मामाच्या गावी सत्कारासाठी आलेल्या खा. पवार यांनी आपल्या आईपासून मिळालेली संस्काराची शिदोरी, गावाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील माती, पाणी, नात्यांकडून संस्कार मिळाल्याने आपण सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले.  

महिलांचा गौरव करताना खा.पवार म्हणाले, महिलेच्या नेतृत्वात कारभार नीट चालतो, हा या गावाने आदर्श दाखविला आहे. हा आदर्श इतरांनी घेतल्यास ती गावेही दुरुस्त होतील. अडचणीतही ज्ञान संपादन करण्यासाठी पराकाष्ठा करून नावलौकिक मिळविता येतो हे माझ्या आईने शिकविले. माझ्या आईचे भोसलेवाडी हे गाव, त्या गावी येण्याची फार दिवसांची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. अंबाबाई-जोतिबा यांचा आशीर्वाद आणि कोल्हापूरकरांचे प्रेम पाठीशी असल्यास कोणतेही अपयश येत नाही हा माझा अनुभव आहे. माझ्या आईचे गाव या जिल्ह्यातील आहे याचा मला मनस्वी अभिमान आहे. प्रताप पवार, दिनकरराव पवार आणि स्वत: मी अशा तिघा भावांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले, असे एखादेच कुटुंब  असते. असे कुटुंब माझे आहे याचा सार्थ अभिमान आहे, असेही पवार म्हणाले.यावेळी आ. हसन मुश्रीफ, खा. महाडिक  यांचीही भाषणे झाली.स्वागत दिलीप पाटील यांनी केले. यावेळी आ. संध्यादेवी कुपेकर, माजी खा. निवेदिता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील, भैया माने, संगीता खाडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, गोलिवडेचे उपसरपंच अर्जुन वसेकर,  परीक्षित पन्हाळकर, जयकुमार शिंदे, अनिल घाटगे उपस्थित होते.

पोटचा गोळा म्हणून मत दिले 
पवार म्हणाले, 1967 साली वयाच्या 27 व्या वर्षी मी विधानसभेची निवडणूक लढविली. काँग्रेसकडून उमेदवारी असल्याने बैलजोडी हे चिन्ह होते. त्यावेळी आईचा काँग्रेसला कडाडून विरोध होता. मतदान करून येताच मी आईला विचारले, आलीस का गाडीला मतदान करून? तर आई ताडकन् म्हणाली, होय, तेच करणार होते, पण काय करणार? पोटचा गोळा आहेस ना  म्हणून बैलजोडीला मत दिले. 

आजोळात नातवाने केली तक्रार 
खा. पवार यांनी आपल्या मिश्किल भाषेत आपली तक्रार असल्याचे सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पूर्वीपासून मामाची मुलगी करून घेण्याची पद्धत आहे. माझ्याबाबत मात्र हे घडले नाही. कारण तुम्ही कधी सांगितले नाही आणि मीही बघितलं नाही. जाऊदे आता, पन्नास वर्षे झाली आहेत, असे म्हणताच उपस्थितांत  हशा पिकला.

नेटके नियोजन
खा. पवार गावात येणार असल्याने गावकर्‍यांनी एकजुटीने नेटके नियोजन केले होते. आसुर्ले-पोर्लेपासून  स्वागत  कमानी उभारल्या होत्या. गोलिवडे गावच्या वेशीवर भव्य स्वागत कमान उभारली होती. तर गावातील झांजपथकांच्या तालात मिरवणुकीने शामियानात नेण्यात आले. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रत्येकाच्या दारात गुढी उभारल्याने सणाचे वातावरण निर्माण होते. फुलांच्या पायघड्या टाकून गावकर्‍यांनी नातवाचे कौतुक केले.