Wed, Jan 16, 2019 13:27होमपेज › Kolhapur › खा. शरद पवार आजपासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर

खा. शरद पवार आजपासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 12:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कारांच्या वितरणासह विविध कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास नकार दिला, तर राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी स्वत: लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खा. धनंजय महाडिक काय पवित्रा घेतात आणि या सर्व घडामोडींवर खा. शरद पवार कोणाला कानपिचक्या देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

खा. पवार यांचे शनिवारी  4.30 वाजता कोल्हापुरात आगमन होणार आहे. कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी ते प्रायव्हेट हायस्कूल येथे उपस्थित राहणार आहेत. उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्याकडे ते रात्रीच्या भोजनासाठी जाणार असून रात्री मुक्काम करणार आहेत. रविवारी सकाळी खा. पवार हे खा. धनंजय महाडिक यांच्यासह सकाळी साडेआठ वाजता गोलिवडे (ता. पन्हाळा) येथे जाणार आहेत. खा. पवार यांचे हे आजोळ असल्याने तेथे ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गोलिवडे येथून ते कोल्हापुरात राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेच्या कार्यक्रमासाठी सकाळी अकरा ते साडेबारा यावेळेत उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला असून ते दुपारी पावणेदोन वाजता पुण्याकडे रवाना होणार आहेत.