Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Kolhapur › राजकीय परिवर्तनात सहभागी होणार्‍यांना सोबत घेऊ

राजकीय परिवर्तनात सहभागी होणार्‍यांना सोबत घेऊ

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 11 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

देशातील सध्याचे चित्र पाहिल्यानंतर राजकीय पातळीवर परिवर्तनाची आवश्यकता असून, त्यासाठी जे जे सहभागी होतील, त्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक झाली; पण त्यावरच प्रहार होत असेल, तर कसले आणि कोणासाठी राजकारण करायचे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. राज्यघटनेसाठी एकत्र येणार्‍यांना आपला पाठिंबा राहील, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रीकल्चरल, एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनतर्फे आयोजित स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर होते. महाराष्ट्र व भारताच्या हिताचे जे जे असेल आणि योग्य त्या विचारांना पाठिंबा देणारे एकत्र येत असतील, तर त्यांना एकत्रित करून त्या माध्यमातून राज्य आणि देशात एकच पर्याय देण्याची स्थिती आली असेल, तर त्याला माझा मनापासून पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.

माझ्या मनातील पक्षाच्या लोकांना कळते

दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुरुवातीला केलेल्या भाषणाचा उल्लेख करीत पवार म्हणाले की, शरद पवार यांच्या मनातील काही कळत नाही, असा उल्लेख डॉ. प्रतापसिंह जाधव व शाहू महाराज यांनी केला, ही गमतीची गोष्ट आहे. माझ्या मनात काय आहे, हे माझ्या पक्षातील लोकांना चांगले कळते. माझी मैत्री निरनिराळ्या पक्षाच्या नेत्यांशी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे अत्यंत घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते; पण निवडणुकीत त्यांनी कधी माझ्या आणि मी कधीच त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. या व्यासपीठावर मी शिवसेना अथवा भाजपवर बोलण्यासाठी उभा नाही. ज्या त्या पक्षाचे वेगवेगळे धोरण असते. त्यानुसार त्यांचे नेते काम करीत असतात.

व्यक्तिगत सलोखा; पण राजकीय भूमिका स्पष्ट

पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसासाठी राज्यघटना लिहिली. सामान्य माणसाच्या हिताच्या राज्यघटनेवरच जर हल्ला होत असेल, तर कसले राजकारण करायचे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी संविधान बचाव रॅली आयोजित केली. त्या रॅलीत आपण आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झालो. माझा व्यक्तिगत सलोखा असतो; पण राजकीय भूमिका स्पष्ट असते. कोल्हापुरातील बिंदू चौकातील जाहीर सभेत ज्या धोरणाला टाळ्या मिळतात, ते धोरण राज्य आणि देश पातळीवर यशस्वी होते; पण जर एखाद्या धोरणाबाबत हा काय सांगतोय म्हणून हेटाळणी झाली, तर ते धोरण सपशेल अयशस्वी ठरते, याची जाणीव आपल्याला आहे.

संविधान बचाव रॅलीत शेट्टी यांच्याशी एकमत

खा. राजू शेट्टी यांचे राजकारण आणि समाजकारण उसाभोवतीच फिरते, असा टोला लगावत पवार म्हणाले की, सत्तेवर हल्ला करावाच लागतो. त्याशिवाय धोरणे बदलत नाहीत. आम्ही सत्तेवर असतानाही शेट्टी यांनी हल्ला केला होता. आम्हाला सोडले नाही; पण संविधान बचाव रॅलीत मात्र आमचे एकमत झाले. देश हितासाठी असे एकमत होेणे आवश्यकच असते.

केंद्राची धनिकांना मदत शेतकरी मात्र वार्‍यावर

केंद्र सरकारचे साखर निर्यात धोरण ज्याप्रमाणे बदलले, त्याचप्रमाणे आयात साखरेवरही 100 टक्के आयात कर लावला गेला. हे चांगले काम सरकारकडून आता घडू लागले आहे. केंद्र सरकारकडून बदल घडू लागले आहेत. ते अजून अपेक्षित आहेत. बँकांची कर्जे बुडविणार्‍या धनिकांना सरकार मदत करीत आहे; पण दमडी न बुडविणार्‍या शेतकर्‍याला वार्‍यावर सोडत आहेत. देशातील मोठमोठ्या उद्योगपती आणि धनिकांनी बँकांचे आर्थिक नुकसान केले आहे. ते भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जात आहे. या धनिकांच्या थकबाकीसाठी मदत होत असताना त्याचप्रमाणे शेतकर्‍यांसाठीही योजना येण्याची गरज आहे.

मंडलिकांनी कष्टाने नेतृत्व प्रस्थापित केले

सदाशिवराव मंडलिक माझे जवळचे सहकारी होते, असे सांगून पवार म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत आणि कष्टाने त्यांनी स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित केले होते. त्यांच्या चांगल्या कर्तृत्वाचा आलेख समाजासमोर मांडावा आणि त्याद्वारे चांगले काम करणार्‍यांचे गुण समाजासमोर ठेवावेत, या हेतूनेच त्यांच्या नावाने आज पुरस्कार प्रदान केले जात आहेत. मंडलिक यांचे जीवनच संघर्षमय होते. कोणत्याही गोष्टीत मनापासून लक्ष घालण्याची त्यांची भूमिका असायची. राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. लोकांच्या भल्यासाठी त्यांनी विधानसभेत आणि लोकसभेत भूमिका मांडली. चारवेळा आमदार आणि चारवेळा खासदार होणे सोपी गोष्ट नाही. त्यांनी जे लोकांसाठी केले म्हणूनच लोकांनी त्यांना आठवेळा आपला राज्य आणि देशपातळीवरील प्रतिनिधी म्हणून निवडले. त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचे काम चांगल्यारीतीने सुरू आहे, ही मोठी समाधानाची बाब असून आपला त्यास पाठिंबा राहील.

सर्वपक्षीय एका व्यासपीठावर हेच मंडलिकांचे यश : प्रतापसिंह जाधव

कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यावर सर्वपक्षीयांचे प्रेम होते, हे व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडे पाहिल्यावर जाणवते. वेगवेगळ्या पक्षात असतानाही सर्व जण एकत्र येतात, हेच कै. मंडलिकांचे यश आहे, असे कौतुकोद्गार ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले.

ऊस दर प्रश्‍नात लवादाची भूमिका

कै. मंडलिक यांच्या वाटचालीचा मी साक्षीदार असल्याचे सांगून त्यांनी आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, ऊस दराचा प्रश्‍न निर्माण झाल्यावर पहिली बैठक ‘पुढारी’ कार्यालयात झाली आणि 1200 रुपयांचा तोडगा निघाला. त्यानंतर दरवर्षी ‘पुढारी’तील बैठकीत उसाचा दर ठरू लागला. बारामती येथे ऊस दरासाठी खा. राजू शेट्टी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले, तेव्हा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विनंतीनुसार ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी लवाद म्हणून काम करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. त्यावेळी पुण्यात जाऊन कौन्सिल हॉल येथे शेतकरी संघटनेचे नेते आणि संबंधित मंत्री यांच्या संयुक्त बैठकीत मी 1800 रुपयांचा सर्वमान्य तोडगा काढला. ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर शेट्टी यांनी आपले उपोषण मागे घेतले.

मंडलिकच खासदारकीचे सेनेचे उमेदवार : केसरकर

व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते दिसत असले तरी प्रा. संजय मंडलिक हेच शिवसेनेतर्फे खासदारकीचे उमेदवार असतील, यात मला तरी अजिबात शंका वाटत नाही, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोरच त्यांनी ही घोषणा केली. 
अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मला ज्यांनी घडवले त्या शरद पवार या गुरूंच्या कार्यक्रमात अध्यक्ष होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त करून राज्यमंत्री केसरकर यांनी जनसमुदायाच्या साक्षीने संजय मंडलिक यांची खासदारकीची उमेदवारी जाहीर करत असल्याचे सांगितले.

म्हणून शेतकर्‍यांची दुर्दशा : खा. राजू शेट्टी

कर्जमाफीचा सरकारने नुसता खेळखंडोबा केला आहे. यांना काय समजत नाही आणि दुसर्‍याचे काय ऐकत नाहीत, म्हणून आज देशभरात शेतकर्‍यांची दुर्दशा झाली आहे, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर केला. ज्या देशाबरोबर सर्जिकल स्ट्राईक करता, त्याच पाकिस्तानातून  साखर आणि कांदा आयात करता, मग ही कुठली राष्ट्रीय अस्मिता, असा सवालही खा. शेट्टी यांनी केला. आज शेतकरी आणि कारखानदार दोघेही हवालदिल झाले असताना कै. मंडलिकांची प्रकर्षाने उणीव भासत आहे. मंडलिक असते, तर त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन बैठक लावली असती. आम्हाला अजून उसाचे हप्ते मिळालेले नाहीत. आता तुम्हीच पुढाकार घ्या, असे आवाहन खा. शेट्टी यांनी शरद पवार यांना केले. मंडलिकांविषयीच्या आठवणींना उजाळा देताना, छाताडावर बसून पैसे घे, असे मंडलिकांनी आपल्याला कसे ठणकावून सांगितले होते आणि कसा घाम फुटला होता, त्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

मंडलिकांनी प्रश्‍नांची कोंडी फोडली : सतेज पाटील

आ. सतेज पाटील यांनी, कै. मंडलिकांनी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक प्रश्‍नांची कोंडी फोडण्याचे काम केले. त्यांनी रचलेल्या पायावर जिल्ह्याला विकासाच्या पातळीवर पुढे नेण्यासाठी संजय मंडलिक यांना नेत्यांचा आशीर्वाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मंडलिकांच्या आठवणींना मुश्रीफांनी दिला उजाळा

पवार आणि मंडलिक यांच्यामुळेच मी परत उभा राहू शकलो. दुर्दैवाने घटना घडल्या. येथून पुढे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची ताकद मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून कै. मंडलिक यांच्याविषयीच्या आठवणींना आ. हसन मुश्रीफ यांनी उजाळा दिला. तब्येत बरी नसल्याने तिकीट द्यायला नको, अशी मी भूमिका घेतली होती; पण मंडलिकांना ती मान्य झाली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. प्रवाहाच्या विरोधात कसे लढायचे, हे मंडलिकांकडून शिका, असे खुद्द पवारच आम्हाला सांगतात, असे मुश्रीफ म्हणाले.

मंडलिकांनी जिद्दीने स्वतःची प्रतिमा निर्माण केली ः आवाडे

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, कै. मंडलिकांनी जिद्दीने स्वत:ची प्रतिमा तयार केली. जिल्ह्याच्या गटातटाच्या राजकारणात इचलकरंजीचा प्रभाव असणार्‍या काळात सदाशिवराव मंडलिक या सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीने आपला वेगळा दबदबा निर्माण केला. त्यामुळे त्यांना ताकद देऊन आमदारकीला निवडून आणण्यासाठी मदत केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील, शाहू महाराज, खा. राजू शेट्टी, महापौर स्वाती यवलुजे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आबिटकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री जयवंतराव आवळे, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील,  माजी आमदार श्रीपतराव शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर.के. पोवार, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार काका पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मारुतराव कातवरे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, प्रा. जयंत पाटील, व्ही. बी. पाटील, राजेखान जमादार, शिवाजीराव जाधव, जयवंतराव शिंपी, सुरेश कुर्‍हाडे, संजय पवार, हिंदुराव शेळके, विजयसिंह मोरे, शिवानी भोसले, कमल पाटील, दुर्गेश लिंग्रस, उदयसिंह पाटील आदी यावेळी उपस्थित होते.