Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन : वटमुखत्यारची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

शालिनी सिनेटोन : वटमुखत्यारची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोनप्रकरणी महापालिकेने हेरिटेजच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करू नये, यासाठी वटमुखत्यार चांगदेव रामभाऊ घुमरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात मनाई याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश पी. एन. देशमुख यांनी याचिका फेटाळली. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. अभिजित आडगुळे यांनी काम पाहिले. 

शहरातील ए वॉर्ड रि. स. नं. 1104 पैकी 5 व 6 हे भूखंड शालिनी सिनेटोन या वापरासाठी आरक्षित करावे, असा ऑफिस प्रस्ताव 12 डिसेंबर 2018 च्या महासभेत सभागृहाने एकमताने नामंजूर केला. त्यानंतर संबंधित भूखंडावर हेरिटेजच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करू नये, यासाठी मालक तुकोजीराव कृष्णाजीराव पवार यांच्या वतीने वटमुखत्यार घुमरे यांनी 12 जानेवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अ‍ॅड. आडगुळे यांनी, मालक पवार हे मयत झाले आहेत. त्यामुळे वटमुखत्यारपत्रही संपुष्टात आले आहे. घुमरे यांना न्यायालयात दाद मागण्याचा कोणताही अधिकार नाही. महापालिकेने संबंधित भूखंड हे ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याअंतर्गत घुमरे हरकत दाखल करू शकतात. परंतु, मालक मयत झाल्यानंतर त्यांच्या नावे याचिका दाखल करून घुमरे यांना दाद मागता येणार नाही, असा युक्तिवाद केला.