Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Kolhapur › शाहूवाडीत शिक्षण विभागाला ठोकले टाळे

शाहूवाडीत शिक्षण विभागाला ठोकले टाळे

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:01AMमलकापूर : वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील रिक्‍त शिक्षकांची पदे त्वरित भरावीत, या मागणीसाठी शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती अश्‍विनी पाटील, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शिक्षण विभागाला टाळे ठोकून पंचायत समिती प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्‍त करण्यात आला.

शाहूवाडी तालुक्यात 882 शिक्षकपदे मंजूर आहेत. मात्र, अद्याप  130 पदे रिक्‍त असल्याने बहुतांश शाळा या शिक्षकांअभावी ओस पडल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाविना कुणीही वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र, याला शाहूवाडी तालुका अपवाद ठरत असल्याने तीव्र संतापाच्या भावना पदाधिकार्‍यांतून व्यक्‍त होत आहेत. आपल्या पाल्याचे भविष्य घडणार कसे, अशा विवंचनेत पालकवर्ग अडकला आहे. याशिवाय शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या 6 मंजूर पदांपैकी एकच विस्ताराधिकारी कार्यरत आहेत. 23 केंद्रप्रमुखांपैकी केवळ नऊच केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. प्रशासनाची धुरा सांभाळणारे गटशिक्षणाधिकारी पदही रिक्‍त असल्याने शिक्षणाचा शाहूवाडी तालुक्यात बोजवारा उडाला आहे. बादेवाडी, चौकेवाडी, कोदे, नांदारी धनगरवाडा, कुंभ्याचीवाडी, क्रांतीनगर या आठ शाळांत शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासूनच एकही शिक्षक नाही. या शाळांतील विद्यार्थ्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.ठिय्या आंदोलनप्रसंगी जि.प. सदस्य हंबीराव पाटील, सभापती अश्‍विनी पाटील, उपसभापती पांडुरंग पाटील, डॉ. स्नेहा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.