Wed, Mar 20, 2019 08:30होमपेज › Kolhapur › शाहूपुरीत मोपेडच्या डिकीतून 2 लाख लंपास

शाहूपुरीत मोपेडच्या डिकीतून 2 लाख लंपास

Published On: Feb 28 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 1:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाहूपुरी बी. टी. कॉलेज परिसरात मोपेडच्या डिकीतून 2 लाखांची रोकड हातोहात लंपास झाल्याची घटना घडली. एमआयडीसीतील फर्ममधील कर्मचार्‍यांच्या पगाराच्या रकमेवर चोरट्याने डल्‍ला मारला. मनोज बाबुराव चौगुले (वय 44, रा. बापट कॅम्प) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी मनोज चौगुले यांचे एमआयडीसीत ओंकार इंटरप्रायजेस नावाचे मशीन शॉप आहे. त्यांनी बँकेतून 2 लाखांची रक्‍कम काढली. रक्‍कम एका कॅरीबॅगमध्ये भरून ती मोपेडच्या डिकीत ठेवली. तिथून ते बी. टी. कॉलेज परिसरात द्राक्षे खरेदी करण्यास आले होते. चौगुले द्राक्षे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने      

बनावट चावीने डिकी खोलून 2 लाखांची रक्‍कम ठेवलेली कॅरीबॅग हातोहात लंपास केली. अवघ्या तीन ते चार मिनिटात हा प्रकार घडला. द्राक्षे खरेदी करून काही अंतरावर असलेल्या मोपेडजवळ चौगुले परतले असता डिकी उघडलेली आढळून आली. या घटनेने ते भांबावून गेले. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. बागल चौक ते बी. टी. कॉलेज, तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करीत आहेत.