Tue, Jul 23, 2019 02:01होमपेज › Kolhapur › शाहू वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रम?

शाहू वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रम?

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 10:57PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रारंभाचा वनवास आता संपणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या शिखर संस्थेने सन 2020 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. यामुळे शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीर्घकाळ रेंगाळलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा होणार असून, सर्वसामान्य गोरगरीब आणि डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना विशेष जागा राखीव ठेवणार्‍या या महाविद्यालयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वप्न साकार तर होईलच, शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या आणि पायाभूत सुविधांची बळकटी प्राप्त होणार असल्याने सर्वसामान्यांना दर्जेदार रुग्णसेवाही उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाने 1999 मध्ये कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नाने हे वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ उभे राहिले; पण गेली 12 ते 15 वर्षे हे महाविद्यालय पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून वंचित होते. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबर राज्यात लातूर आणि अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी झाली.

तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होऊन वर्षे लोटली आणि संबंधित महाविद्यालयांना नुकत्याच दुसर्‍या टप्प्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव जागा उपलब्ध झाल्या; परंतु शाहू वैद्यकीय महाविद्यालय मात्र राजकीय अनास्थेची शिकार बनले होते. याकडे दै. ‘पुढारी’ने एका विशेष वृत्ताद्वारे लक्षही वेधले होते. आता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेच 2020 पर्यंत देशातील पदवी अभ्यासक्रम शिकविणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले नाहीत, तर संबंधितांच्या पदवी अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराच दिल्यामुळे शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

भारतामध्ये वैद्यकीय सुविधांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या खूपच नगण्य असल्याने वैद्यकीय सेवांवर ताण पडतो आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागाही मर्यादित असल्याने नवे तज्ज्ञ डॉक्टर्स तयार होण्याचा मार्गही संकुचित आहे. 

या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्‍त करताना वैद्यकीय अभ्यासक्रमात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची गरज प्रतिपादित केली होती. आता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेच दणका दिल्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे. 

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा बडगा

महाराष्ट्रामध्ये 25 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यापैकी 23 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्‍न आहेत. यातील कोल्हापूर, धुळे, चंद्रपूर आणि गोंदिया या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू नाहीत. ही महाविद्यालये प्रतिवर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करतात, पण प्रत्यक्षात हे सोपस्कार कागदोपत्री असल्याचे लक्षात आल्यानंतर मेडिकल कौन्सिलने हा बडगा उगारला आहे.