होमपेज › Kolhapur › शाहू वैद्यकीय महाविद्यालय ‘मेडिकल हब’ बनविणार

शाहू वैद्यकीय महाविद्यालय ‘मेडिकल हब’ बनविणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा देऊन आगामी दोन वर्षांत हे महाविद्यालय एक आदर्श मेडिकल हब म्हणून विकसित केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 72 कोटी 26 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणार्‍या विविध इमारतींच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

विविध प्रकल्प

पालकमंत्री पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू झालेल्या या महाविद्यालयात 700 बेडचे प्रशस्त रुग्णालय, 100 बेडचे महिला रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि कॅन्सर तपासणी सेंटर असे विविध वैद्यकीय प्रकल्प साकारण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास लागणारी बस व अ‍ॅम्ब्युलन्स तसेच विद्यार्थ्यांसाठी जिम प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

राज्याचे महसुली उत्पन्‍न वाढत असून उत्पन्‍नवाढीचे विविध मार्ग शासन हाताळत आहे. उत्पन्‍नवाढीच्या प्रयत्नातून राज्यात विविध विकास कामांचे प्रकल्प हाती घेतले जात असल्याचेही ते म्हणाले. महाविद्यालयासाठी कै. दिग्विजय खानविलकर यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला.

आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआरच्या विकासाचा पाया स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांनी घातला. त्यानतंर मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झाले. युतीचे सरकार येताच पुन्हा गतीने कामे मार्गी लागत आहेत.

आ. अमल महाडिक म्हणाले, सरकार गतिमान आहे. याचे उदाहरण या महाविद्यालयात विविध प्रकल्प मार्गी लागत आहेत. सीपीआर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच सावित्रीबाई फुले रुग्णालयासाठीही निधी द्यावा.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, प्रभारी वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष आशिष ढवळे, संदीप देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण नकाते, किरण शिराळे, रूपाराणी निकम,  विजय जाधव,  डॉ. शिशिर निरगुंडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. एम. उगले उपस्थित होते.

700 बेडचे हॉस्पिटल,  100 बेडचे महिला हॉस्पिटल, कॅन्सर तपासणी सेंटर, दंत महाविद्यालय प्रकल्प
दोन वर्षांत सर्व सोयी सुविधा पुरविणार
बस, अ‍ॅम्ब्युलन्स, जिम उपलब्ध करून देणार

 

Tags : kolhapur, kolhapur news, Shahu Medical College, Medical Hub, Chandrakant Patil,


  •