Fri, May 24, 2019 03:18होमपेज › Kolhapur › शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील 6 प्राध्यापकांचे राजीनामे? 

शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील 6 प्राध्यापकांचे राजीनामे? 

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:46AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

शासकीय सेवेत नोकरी करत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचा अथवा त्याला पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवून राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासनाने बदल्यांचे सत्र सुरू केल्याने कमालीची अस्वस्थता पसरली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सुमारे 6 प्राध्यापकांनी शासनाचे आपले राजीनामे सादर केल्याचे वृत्त आहे. याखेरीज आणखी दोन प्राध्यापक बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या मानसिकतेत नसून त्यांनीही राजीनाम्याची तयारी केल्याचे समजते. विशेष म्हणजे, शासनाने खासगी व्यवसायाचा हा निकष केवळ कोल्हापूरपुरताच लावल्यामुळे शासनाची ही कृती वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या परिवर्तनासाठी की सूड आहे, याची चर्चा आता वैद्यकीय व्यावसायिकांच्या वर्तुळात सुरू झाली 
आहे.

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने गेल्या काही दिवसांत राज्यात बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. यामध्ये काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या बदल्या विशेष गाजल्या. त्याहीपेक्षा कोल्हापुरातील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर करण्यात आलेले बदल सध्या विशेष चर्चेत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्वप्रथम खासगी व्यवसाय करणार्‍या प्राध्यापकांना पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तडकाफडकी बदली केली. त्यानंतर सुमारे 15 प्राध्यापकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्यासह सर्जरी, रेडिओलॉजी, त्वचा, कान, नाक, घसा, बालरोग, स्त्रीरोग आदी विभागांतील सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता यांचा समावेश आहे. या बदली केलेल्या प्राध्यापकांपैकी 6 शिक्षकांनी शासनाकडे आपले राजीनामे सादर केले. 2 प्राध्यापक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत, तर 6 प्राध्यापकांनी बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी आपला बाडबिस्तारा गोळा करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. 

वैद्यकीय महाविद्यालयातून बदली झालेल्या एकूण 16 जणांपैकी अधिष्ठातापदावर डॉ. सुधीर नणंदकर रुजू झाले; पण वैद्यकीय अधीक्षक या पदावर मात्र अद्याप कोणी रुजू न झाल्याने त्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित बदली झालेल्या प्राध्यापकांच्या जागेवर बाहेरून बदली होऊन आलेल्या केवळ एका प्राध्यापकाचा अपवाद वगळता अन्य जागांवर कोणीही अद्याप रुजू झाले नाही. परिणामी, रुग्णालयातील रेडिऑलॉजी, त्वचा, सर्जरी, डायलेसिस या विभागांमध्ये कोणी वरिष्ठ उरला नाही, अशी स्थिती असून कनिष्ठ अधिकार्‍यांकरवी हे विभाग चालविण्याची वेळ आली आहे. साहजिकच, या पदांवर तातडीने नवे प्राध्यापक हजर झाले नाहीत, तर सीपीआर रुग्णालयाच्या कारभारावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

बदली धोरण सर्वसमावेशक नाही...

वैद्यकीय शिक्षण विभागाने खासगी व्यवसायाचा ठपका ठेवून कोल्हापुरात मेगा बदलीचे धोरण अवलंबिले असले, तरी हे धोरण संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी सर्वसमावेशक नाही, अशी वैद्यकीय व्यावसायिकांची तक्रार आहे. कारण, राज्यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी बहुतांश महाविद्यालयांच्या ठिकाणी आजही अनेक शिक्षक मोठी रुग्णालये थाटून व्यवसाय करीत आहेत. या शिक्षकांना हात न लावता वैद्यकीय शिक्षण विभागाने केवळ कोल्हापुरात या धक्का तंत्राचा अवलंब केला. यामुळे काम करणारा शिक्षकवर्ग बदलला गेला; पण तेथे नव्याने क्षमता आणि जबाबदारी असणारा नवा शिक्षकवर्ग काही दाखल झाला नाही. या कृतीने प्रगतिपथावर असलेल्या सीपीआर रुग्णालयाच्या कारभाराचा आलेख घसरणीला लागण्याचा धोका असल्याने शासनाची ही कृती परिवर्तन की सूड, याविषयी चर्चेला रंग भरतो आहे.