Thu, Apr 25, 2019 03:53होमपेज › Kolhapur › शाहू माने ‘युवा ऑलिम्पिक’साठी पात्र

शाहू माने ‘युवा ऑलिम्पिक’साठी पात्र

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापूरच्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत कोल्हापूरचा नवोदित नेमबाजपटू शाहू तुषार माने याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. जपान येथे झालेल्या ‘एशियन एअरगन शूटिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत शाहू माने याने 10 मीटर रायफल शूटिंग प्रकारात वैयक्‍तिक कांस्यपदकाची कमाई केली. या यशामुळे त्याची निवड ‘युवा ऑलिम्पिक’ स्पर्धे-साठीच्या भारतीय संघात झाली आहे. पुढील वर्षी अर्जेंटिना येथे होणार्‍या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तो खेळणार आहे.

नुकत्याच बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत शाहूने 400 पैकी 399 गुणांसह सांघिक व वैयक्‍तिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या यशस्वी कामगिरीमुळे त्याची निवड जपान येथील आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात झाली होती. विश्रांती न घेता शाहूने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या यूथ विभागात त्याने 623 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. यात सांघिक  सुवर्ण व वैयक्‍तिक कांस्यपदकाचा वेध घेतला.

शाहू सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी असून रामानंदनगर-म्हाडा कॉलनी परिसरातील वेध शूटिंग अ‍ॅकॅडमीत सराव करत आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार, कोल्हापूर जिल्हा मेन-वुमेन रायफल असो.चे पदाधिकारी, सेंट झेवियर्सचे मुख्याध्यापक जेम्स थोरात, क्रीडाशिक्षक किरण साळोखे, अल्ताफ कुरेशी, मोहन लोहार आदींचे मार्गदर्शन लाभले.

अविस्मरणीय दिवस...

सेंट झेवियर्स स्कूलचा हिरकमहोत्सवी कार्यक्रम शनिवारी झाला. नेमक्या याच दिवशी  शाळेचा विद्यार्थी शाहू तुषार माने याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विशेष कामगिरीसह पदकाची कमाई करून ‘यूथ ऑलिम्पिक’ स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. यामुळे हा दिवस शाहूसह शाळेसाठीही अविस्मरणीय ठरला. दरम्यान, सोमवारी दि. 11 डिसेंबर रोजी शाहूचे कोल्हापुरात आगमन होणार असून त्याची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता, कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा भक्‍कम पाया निर्माण करणार्‍या लोकराजा राजर्षी शाहू  महाराज यांच्या स्मारकाच्या साक्षीने त्याचा विशेष गौरव होणार आहे. यावेळी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.