Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Kolhapur › शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला ११७ वर्षे पूर्ण

शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला ११७ वर्षे पूर्ण

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 मध्ये आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढला. त्यास 26 जुलै 2018 रोजी 117 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती मानवी साखळी करून मानाचा मुजरा केला. यावेळी सर्व जाती-धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शेकडो कार्यकर्ते मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते. ‘राजर्षी शाहू महाराज की जय’, ‘एक मराठा... लाख मराठा’, या घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. पुरुषांच्या बरोबरीने कोल्हापुरातील रणरागिणीदेखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आरक्षणाचा निर्णय सरकारने त्वरित घ्यावा. आरक्षणाचा निर्णय सरकारला घेता येत नसेल तर त्यांना राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे अनेकांनी आपल्या भाषणातून सरकारला ठणकावले.

मानवी साखळीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्षासह इतर मित्रपक्षदेखील सहभागी झाले होते. आमदार चंद्रदीप नरके, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, इंद्रजित सावंत, माजी महापौर विक्रम जरग, कुंभी बँकेचे अजित नरके, प्रा. जयंत पाटील, दिलीप देसाई, सचिन तोडकर, मराठा महासंघाचे महादेव पाटील, गणी आजरेकर, मनोज नरके यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या विविध सेल व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर विविध संघटनांनी सकल मराठा ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.

मराठा क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांची आज बैठक 

मराठा क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांची आज (शुक्रवार दि. 27) सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ येथे ही बैठक आयोजित केली आहे. 31 जुलै रोजी अंबाबाईचा जागर व साकडे, त्याचबरोबर 9 ऑगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर बंद बाबतची चर्चा बैठकीत केली जाणार आहे.