Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Kolhapur › शाहू महाराजांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शाहू महाराजांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पर्यावरण जतनाबाबतच्या प्रबोधनासह, लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांनी कोल्हापुरात रविवारी शाहू  छत्रपती महाराज यांचा 70 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी रात्री न्यू पॅलेसच्या प्रांगणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, माजी आ. पी. एन. पाटील, कर्नल अलेक्स मोहन, कर्नल आर. एस. लेहल, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, सौ. गीतादेवी जाधव, ‘कस्तुरी’ क्‍लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी जाधव, सौ. अरुंधती महाडिक, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत खा. संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे, याज्ञसेनी महाराणी, संयोगीताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजे व छत्रपती कुटुंबीयांनी केले. 

शाहू महाराजांच्या साधेपणाचे कौतुक

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपणारे सर्वसामान्यांचे छत्रपती म्हणून शाहू महाराज यांनी आपली ओळख निर्माण केल्याचे गौरवोद‍्गार मान्यवरांनी काढले. 

दै. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, साधेपणा जपणारे शाहू महाराज फुटबॉलचे मैदान, टोल आंदोलन, मराठा मोर्चा यात जनतेसोबत राहिले आहेत. यामुळेच त्यांच्यावर लोक प्रेम करतात. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपले लोकोपयोगी कार्य अखंड सुरू ठेवले आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिसप्रमुख संजय मोहिते, खा. धनंजय महाडिक, माजी आ. मालोजीराजे यांनीही शाहू महाराज यांच्या साधेपणासह विविध गुणांबाबत सांगून त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे सांगितले.

दरम्यान, दिवसभर छत्रपती शाहू विद्यालयाच्या प्रांगणात शाहू महाराज यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यात महापौर स्वाती यवलुजे, आमदार सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके,  माजी आ. प्रकाश आवाडे, काँग्रेसचे प्रल्हाद चव्हाण, शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, शिवसेनेचे संजय पवार, उद्योजक व्ही. बी. पाटील, आनंद माने, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे,  माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, उपमहापौर सुनील पाटील,  

नगरसेवक, विविध संस्था-संघटना, तालीम-मंडळे, राजकीय पक्ष, सरदार घराण्यातील प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यांचा समावेश होता. तत्पूर्वी, सकाळी जुना राजवाडा येथे तुळजाभवानीच्या दर्शनानंतर अ. भा. शिवराज्याभिषेक समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, शिवशाहू मंच व संभाजीराजे फौंडेशन यांच्या वतीने शाहू महाराज यांना 71 देशी वृक्ष भेट देण्यात आले. यानंतर न्यू पॅलेस येथील पोलो मैदानावर ‘ग्रासरूट डे’चे उद्घाटन शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. याशिवाय बालकल्याण संकुलातील मुलांना स्वेटर वाटप, अवनि संस्थेला बांधकाम साहित्य वाटप, असे विविध उपक्रम झाले. 

शाहू महाराजांचे विविध संस्थांच्या माध्यमातून चौफेर कार्य

शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी, लोकराजा राजर्षी शाहू यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्‍या शाहू छत्रपती महाराज यांनी देशभरातील विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून आपले चौफेर कार्य अविरत सुरू ठेवले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक कार्य त्यांच्याकडून सुरू आहे. पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी सोसायटी मिलिट्री स्कूल आणि कोल्हापुरातील छत्रपती शाहू विद्यालयाच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. तारा कमांडो फोर्सच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण करत आहेत.

छत्रपती शाहू स्टेडियम बांधून कोल्हापूर स्पोर्टस् असो. (केएसए) च्या माध्यमातून शतकी फुटबॉल परंपरा जोपासण्याबरोबरच ती विकसित केली आहे. न्यू पॅलेस येथे छत्रपती शहाजी म्युझियम उभारण्याबरोबरच महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून संशोधन कार्य सुरू ठेवून इतिहास जतन-संवर्धनाचे आणि राष्ट्रीय संपत्ती संरक्षणाचे मोलाचे कार्य ते करत आहेत.

याशिवाय शहाजी छत्रपती फिजिकल एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन, माजी सैनिक प्रतिष्ठानचे चिफ पेट्रन, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्‍लब मुंबई, नॅशनल हॉर्स बिल्डिंग सोसायटी ऑफ पुणे, नॅशनल रायफल असो. ऑफ इंडिया नवी दिल्‍ली, आर्मी ऑफिसर्स इन्स्टिट्यूट मुंबई, रेसिडेन्सी क्‍लब कोल्हापूर, इक्‍विस्ट्रेन फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्‍ली, क्‍लब महिंद्रा चेन्‍नई अशा संस्थांचे ते आजीव सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ रत्न पुरस्काराचा समावेश आहे.