Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Kolhapur › ब्लॉग : शाहू महाराजांच्या गंगाराम कांबळे यांच्या 'सत्यसुधारक हॉटेल'ची शताब्दी

ब्लॉग : शाहू महाराजांच्या गंगाराम कांबळे यांच्या 'सत्यसुधारक हॉटेल'ची शताब्दी

Published On: Mar 11 2018 2:24PM | Last Updated: Mar 11 2018 2:24PMकोल्हापूर : महादेव कांबळे 

समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळात विविध कृती कार्यक्रम हाती घेऊन समाज सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकीच एक म्हणजे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेले 'सत्यसुधारक हॉटेल'. ज्या काळात रूढी, परंपरा,जातपात पाळल्या जात त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी महार समाजातील व्यक्तीला हॉटेल सुरू करून द्यायचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शाहू महाराजांनी हा फक्त निर्णयच घेतला नाही तर त्यासाठी स्वत: त्यांनी अर्थसहाय्य आणि इतर मदत केली. यावर्षी या 'सत्यशोधक हॉटेल'चा शताब्दी महोत्सव होत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरमध्ये राजर्षी शाहू समता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राजर्षी शाहू समता पुरस्काराचे वितरणही होत आहे. 

शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेल्या सत्यसुधारक हॉटेल शताब्दी साजरी करीत आहे. कोल्हापूर शहरातील महत्वाच्या राजरस्त्यावर भाऊसिंगजी रोड येथे हॉटेल सुरू करून दिले. त्या काळात एका अस्पृश्य समाजातील माणसाने एखादे दुकान किंवा हॉटेल, व्यवसाय सुरू करणे सोपे नव्हते आणि ते चालवणेही सोपे नव्हते. शाहू महाराजांनी हॉटेल सुरू करून दिल्यानंतर खरा प्रश्न निर्माण झाला तो महार समाजातील व्यक्तिच्या हातचा चहा कोण घेणार? हा प्रश्न स्वत: गंगाराम कांबळे यांना होताच त्यापेक्षा त्याची काळजी शाहू महाराजांना होती. 

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. म्हणून त्यांनी कोल्हापूरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुस्लीम, शिंपी, दैवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा अठरा पगड जातींसाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे कठीण काम होते, म्हणून त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृह सुरू केले. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्त्या सुरू करून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 

शाहू महाराजांच्या कारकीर्दीतील गंगाराम कांबळे यांचे 'सत्यसुधारक हॉटेल' सुरू झालेले हॉटेल हा सुध्दा समाज सुधारणेतील एक महत्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे. गंगाराम यांना हॉटेल काढून देण्याचाच फक्त त्यांनी निर्णय घेतला नाही. एका अस्पृश्य समाजातील माणसाचे हॉटेल चालावे त्यांनी एक नामी शक्कल लढवली. इतिहासात आजही ती सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहे. सकाळच्या वेळेला शाहू महाराज घोडागाडीतून फेरफटका मारत असत. यावेळी शाहू महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलसमोर थांबून भारदस्त आवाजात घोडागाडीमध्ये बसलेल्या सर्वांना गंगाराम यांना चहा आणायला सांगत. स्वत: शाहू महाराज गंगारामच्या हातचा चहा घेतात म्हटल्यावर घोडागाडीतील सर्वांना चहा पिणे भाग पडे. शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी यानिमित्ताने समाजातील जातीपातीला मूठमाती मिळावी यासाठी यानिमित्ताने प्रयत्न केले. शाहू महाराजांची सही कुणाला हवी असेल तर गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलमध्येच या म्हणून सांगितले जात असे. यामुळे गंगाराम यांच्या हॉटेलवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली. यावेळी शाहू महाराज येणार्या प्रत्येकाला गंगाराम कांबळे यांच्या हातचा चहा पाजून मगच सही करत. 

स्त्री शिक्षणासाठी शाहू महाराजांनी राजाज्ञा काढली, समाजातील जाती धर्माच्या भिंती नाहीशा व्हाव्यात म्हणून सवर्ण आणि अस्पृश्य मुलांच्या भरणार्या शाळा बंद केल्या. सरकारी नोकर्यांसाठी अस्पृश्य समाजासाठी राखीव जागांची तरतूद करून दलित, वंचित घटकांना नोकर्या मिळवून देण्याचे महान कार्य शाहू राजांनी केले. 

समाजात प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळावी म्हणून शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती या ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. समानतेसाठी दलितांच्या कार्य उध्दारासाठी छत्रपतींच सिंहासन सोडावे लागले तरी त्याची मला पर्वा नाही अशी घोषणा या रयतेच्या राजांनी काढली होती म्हणूनच या राजाला माझा राजा रयतेचा राजा म्हटले जाते. 

शाहू महाराजांना रयतेचा राजा का म्हटले जाते याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. शाहू राजांनी संस्थानात कोणती योजना फक्त जाहीर करून थांबले नाहीत. ती कोणतीही योजना, कार्यक्रम कृतीत आणण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घेत. 

शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. हेच गंगाराम कांबळे पुढे अस्पृश्य समाजाचे पुढारी बनले. अस्पश्योध्दाराच्या काळात महाराजांचे ते कार्यकर्ते झाले. शाहू महाराजांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्य मुक्तीच्या लढ्यात कोल्हापूर संस्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठवान कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले.