Sun, Jul 21, 2019 02:13होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार

आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लग्‍नाचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर कर्नाटकातील डॉक्टरने दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीला आली. डॉ. आकाश महादेवराव आवटी (वय 38, रा. आवटी बिल्डिंग, गुलबर्गा) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने पीडित युवतीला सोशल मीडियाद्वारे बदनामी व जीवे मारण्याची धमकीही दिली आहे, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संशयिताला लवकर अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावलेल्या 33 वर्षीय महिला खेळाडूची डिसेंबर 2016 मध्ये सोशल मीडियावर गुलबर्गा येथील वैद्यकीय व्यावसायिक आकाश आवटी याच्याशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री वाढली. त्यानंतर संशयित स्वत: कोल्हापुरात आला. युवतीची भेट घेऊन तिच्यासमोर लग्‍नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही होकार दर्शविला.

डिसेंबर 2016 ते 2 मार्च 2018 या दोन वर्षांच्या काळात आवटीने युवतीला गोवा येथील लॉज तसेच बंगळूर येथील रूमवर नेऊन बळजबरी करीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांपूर्वी पीडित युवतीने लग्‍नासाठी त्याच्याकडे तगादा लावला. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला.दोघांत अनेकदा जोरात वादावादीही झाली. युवतीने पिच्छा सोडावा, यासाठी त्याने मानसिक  छळ करून सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली.  शिवाय घटनेची वाच्यता केलीस, तर जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.

युवतीने बुधवारी सकाळी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेतली. डॉ. आकाश आवटीविरुद्ध तिने फिर्याद दाखल केली आहे. भारतीय दंडविधान संहिता 376, 505 अन्वये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासाधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.