Tue, Apr 23, 2019 00:21होमपेज › Kolhapur › ‘घरगुती’चा नाद; करून टाकतो सारं बरबाद!

‘घरगुती’चा नाद; करून टाकतो सारं बरबाद!

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:03AM

बुकमार्क करा

कोल्हापूर :

अनेक आंबटशौकीन वेश्यागमन करायला गेल्यानंतरही ‘घरगुती’चा आग्रह धरतात. कॉलगर्ल व्यवसायातील दलाल ‘घरगुती’च्या नावाखाली एखादी सराईत कॉलगर्लच त्याच्या दिमतीला देत असतात. मात्र, ‘घरगुती’च्या नादाला लागलेल्या अनेकांना पुढची बरबादी मात्र सगळं उद्ध्वस्त झाल्यावरच दिसते. कोल्हापुरातील सेक्स रॅकेटचा हा ‘घरगुती’ फंडा सध्या विशेष फार्मात आणि चर्चेत आहे.

अनेकवेळा कॉलगर्ल आदी दलालांकडून ग्राहकाला नेमके हेरून विश्‍वासाने त्याची घरगुती, वैयक्‍तिक व सामाजिक पार्श्‍वभूमी आणि प्रामुख्याने त्याच्या सांपत्तीक स्थितीची माहिती मिळवून पद्धतशीर प्लॅनिंगने ग्राहकांना या ‘घरगुती’ जाळ्यात गुंतवण्यात येते. प्रामुख्याने विवाहित, प्रतिष्ठित आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पैसेवाला हे तीन निकष असतील तरच त्या ग्राहकाला ही ‘घरगुती’ नावाची सेवा पुरवली जाते.

साधारणत: अशा ग्राहकाने ‘घरगुतीची’ मागणी केली की दिसायला एखादी सुंदर मध्यमवर्गीय, साधारणत: 20 ते 25 या वयोगटातील कॉलगर्ल त्याच्याकडे पाठवली जाते. वेश्या व्यवसायात दिसून येणारे परंपरागत लाडीक नखरे आणि सराईत हावभाव तिच्याकडे बघायला मिळत नाहीत. त्यामुळे ती खरोखरच एखादी गरीब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील युवती असावी, याची ग्राहकाला खात्री पटते आणि ‘घरगुती स्वाद’ घेतल्याच्या आनंदात स्वारी परतते. त्याच युवतीला पुन्हा पुन्हा त्याच त्या ग्राहकाकडे मागणीनुसार पाठवले जाते. ती कॉलगर्लही वेगवेगळ्या माध्यमातून आपण ‘तशी’ नसल्याचे खात्री पटवून देण्याचे नाटक करते.

पहिल्या दोन-तीन वेळा ठरलेले पैसे घेते; पण नंतर सावज पुरतं जाळ्यात फसलंय याची जाणीव होताच  काही वेळेस ‘मोफत सेवा’ पुरवली जाते. ही मोफत सेवा म्हणजे या जाळ्याचा पहिला फास असतो. त्याची या सावजाला गंधवार्ताही नसते. हळूहळू ही कॉलगर्ल संबंधित ग्राहकाकडून या मोफत सेवेच्या मोबदल्यात महागड्या नजराण्यांची फर्माइश सुरू करते. तिचा दर परवडला; पण हा नजराणा नको, अशी हळूहळू अवस्था येते. तोपर्यंत गडी जाळ्यात पुरता गुरफटून गेलेला असतो.

हळूहळू दिवसा, रात्री मध्यानरात्री कधीही तिचे फोन यायला चालू होतात, वेगवेगळ्या फर्माइशींचं शेपूट वाढायला लागत. शेवटी शेवटी ग्राहकही वैतागून तिला टाळायला लागतो. पण ती आणि तिचे दलाल त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्याची ही भानगड गावभर करण्याची, प्रसंगी पोलिस तक्रार करण्याची धमकी देतात. आजपर्यंत अनेकांनी या घरगुती जंजाळात अडकून हात भाजून घेतले आहेत. कोल्हापुरातील हाय प्रोफाईल कॉलगर्ल व्यवसायातील हा खास एक राखीव फंडा आहे.

घरगुती गंत्याची किंमत

घरगुतीचा नाद करणारा सहसा असतो प्रतिष्ठीत, उद्या काही कमी-जास्त झालं तर ‘अब्रूचं खोबरं व्हायला नको, हा त्याचा हिशेब. अखेर एजंटाशी आणि संबंधीत बयेशी बोलाचाली होतात. ग्राहकाची सामाजिक प्रतिष्ठा जेवढी मोठी आणि जेवढा जास्त पैसा, तेवढी मोठी ‘मांडवली’. ग्राहकाच्या ऐपतीनुसार कधी हजारात तर कधी लाखात सौदा होवून एकदाची त्याची या ‘घरगुती’ गुंत्यातून ‘सुटका’ होते.